नागपूर : कोतवाली पोलिसांनी गोदाम फोडून तांब्याच्या आणि ॲल्युमिनियमच्या वायरची चोरी करणाऱ्या चार आरोपींना अटक केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी वकीलपेठ परिसरातून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून चोरीचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली ई-रिक्षा जप्त करण्यात आली आहे.
कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना नंदनवन परिसरात वैभव नायगावकर यांच्या गोदामाला चोरट्यांनी लक्ष्य केले. १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी गोदाम बंद करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे १० वाजता गोदाम उघडण्यासाठी गेले असता दरवाजाचा खालचा भाग तुटलेला आढळून आला.
गोदामाची पाहणी केली असता ८ बंडल तांब्याची वायर आणि २० बंडल ॲल्युमिनियम वायर चोरीला गेल्याचे समोर आले. चोरीच्या मालाची किंमत सुमारे दीड लाख रुपये होती. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांना चोरीतील आरोपी वकीलपेठ परिसरात असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस पथकाने कारवाई करत धीरेंद्र ऊर्फ बुल्ली, विनोद सालमे, जितेंद्र दांडेकर आणि चेतन कहाते यांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी चोरीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपींच्या निशाणदेहीवरून धीरेंद्र गणवीर याच्या घराबाहेर उभ्या असलेल्या ई-रिक्षाची झडती घेण्यात आली. त्यातून १८ बंडल ॲल्युमिनियम वायर, ३ बंडल तांब्याची वायर आणि ३ किलो इतर तांब्याची वायर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चोरीसाठी वापरण्यात आलेली ई-रिक्षाही पोलिसांनी ताब्यात घेतली.
पोलिसांच्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १ लाख ८८ हजार रुपये आहे. अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींची पुढील चौकशी सुरू असून, चोरीच्या या प्रकरणात आणखी काही बाबी उघड होण्याची शक्यता आहे.




