Published On : Sat, Aug 15th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या मेयोमध्ये गोरगरिबांसाठी जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा उभारणार; बावनकुळेंचे आश्वासन

- हिरक महोत्सवी वर्षाचा थाटात शुभारंभ
Advertisement

नागपूर : ग्रामीण तसेच शहरी भागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी उपचाराचे मोठे आधारस्थान ठरलेल्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात मेयो रुग्णालयाच्या हिरक महोत्सवी वर्षाला आज प्रारंभ झाला. या वर्षात रुग्णांना अधिक अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून आवश्यक निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

मेयोच्या प्रशासकीय इमारतीतील सभागृहात आयोजित हिरक महोत्सवी वर्षाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांच्यासह डॉ. सतीश देवपुजारी, डॉ. भावना सोनवणे, डॉ. राजीव खंडेलवाल, माजी आमदार डॉ. मिलिंद माने तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

गेल्या सहा दशकांच्या वाटचालीत मेयोने नागपूरसह विदर्भातील आरोग्यसेवेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपासून ग्रामीण भागातील रुग्णांपर्यंत हजारो नागरिकांना येथे उपचार मिळाले आहेत. अनेक कुशल डॉक्टरांनी गंभीर आजारांवर उपचार करून रुग्णांना नवजीवन दिले आहे. त्यामुळे मेयोचा इतिहास हा केवळ वैद्यकीय शिक्षणाचा नसून जनसेवेचा असल्याचे बावनकुळे यांनी नमूद केले.

हिरक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने रुग्णाभिमुख विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. रुग्णांच्या गरजा लक्षात घेऊन महाविद्यालयातील समिती सदस्यांशी चर्चा करून व्यापक विकास आराखडा तयार करण्यात येईल. तसेच मेयोमधून शिक्षण घेतलेल्या देश-विदेशातील नामांकित डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांना रुग्णसेवेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.

Advertisement

दरम्यान, हिरक महोत्सवाच्या निमित्ताने रुग्णांसाठी काही नवीन डिजिटल आणि आधुनिक सुविधांचा शुभारंभ करण्यात आला. डिजिटल मॅमोग्राफी, पेन क्लिनिक तसेच केंद्रीय वैद्यकीय प्रयोगशाळेतील तपासणी अहवाल थेट रुग्णांच्या मोबाईलवर उपलब्ध करून देणाऱ्या सुविधेचे पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांनी आपल्या प्रास्ताविकातून मेयोच्या ऐतिहासिक वाटचालीचा आढावा घेतला. गर्भावस्थेतील बाळामध्ये हिमोग्लोबीनशी संबंधित विकारांचे अचूक निदान करण्याच्या क्षेत्रात मेयो देशातील अग्रगण्य रुग्णालय असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन डॉ. गोपाल अग्रवाल यांनी केले, तर आभारही त्यांनी मानले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.