
नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५७व्या जयंतीनिमित्त काँग्रेसच्या वतीने व्हेरायटी चौक येथे ‘बापू तुम्हे प्रणाम’ या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जागतिक अहिंसा दिवस आयोजन समिती आणि पश्चिम नागपूर काँग्रेस कमिटीच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उपस्थित नागरिकांनी त्यांना अभिवादन केले. सुप्रसिद्ध गायिका सुरभी ढोमणे, गुणवंत घटवाई आणि त्यांच्या चमूने सादर केलेल्या सुमधुर भजनांमधून महात्मा गांधींना आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री व माजी खासदार विलास मुत्तेमवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यादवराव शिरपुरकर, विधान परिषद आमदार अभिजीत वंजारी, नगरसेवक केतन विकास ठाकरे यांच्यासह दक्षिण-पश्चिम विधानसभा झोपडपट्टी सेलचे आतिश झिंगरे, शहर काँग्रेस महासचिव पंकज निघोट, पंकज थोरात तसेच काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनीही कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.



