
नागपूर : सदर परिसरातील हॉटेल तुली इंटरनॅशनलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान अल्पवयीन मुला-मुलींना कथितरित्या हुक्का उपलब्ध करून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. माहिती मिळताच सदर पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला. यावेळी हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरील वेगवेगळ्या खोल्यांमध्ये काही अल्पवयीन मुले-मुली हुक्का सेवन करताना आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी रात्री हॉटेलमध्ये ‘शहर गुलाबी’ नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने युवक-युवती उपस्थित होते. त्यात अल्पवयीनांचाही समावेश होता. कार्यक्रमादरम्यान हॉटेलच्या खोल्यांमध्ये हुक्क्याची व्यवस्था करण्यात आल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी चौथ्या मजल्यावरील खोल्यांची तपासणी केली असता हुक्का पॉट, फ्लेवर आणि इतर साहित्य आढळून आले. तसेच काही अल्पवयीन हुक्का सेवन करताना आढळले. या खोल्या भाड्याने देताना आवश्यक नोंदी ठेवण्यात आल्या नसल्याचेही प्राथमिक तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी हॉटेल मालक, व्यवस्थापक फिरोज, इव्हेंट आयोजक नेरुल यांच्यासह मुंबई येथील आबिद शफीक काजी (२०) आणि पनवेल येथील अलीशा मॅन्युअल चेरी (२२) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरोधात कोटपा कायद्यासह विविध कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.
हॉटेलमध्ये अल्पवयीनांना खोल्या कोणत्या आधारावर उपलब्ध करून देण्यात आल्या आणि हुक्क्याची व्यवस्था नेमकी कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आली, याचा सदर पोलिसांकडून तपास सुरू आहे.




