नागपूर : आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवरून नागपुरात वातावरण तापले आहे. सिव्हिल लाइन्स येथील एटीसी कार्यालयात आयसा अध्यक्ष नेहा बोरा यांनी शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांनी शिक्षणासह विविध मागण्या बोरांसमोर मांडल्या.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी करत नेहा बोरा यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या सोडवण्यात सरकार अपयशी ठरल्यास आदिवासी मंत्री आणि मुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा, असा थेट इशारा त्यांनी दिला.
विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आयसा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचेही बोरा यांनी स्पष्ट केले. वसंतराव देशपांडे सभागृहातील कार्यक्रमापूर्वी झालेल्या या भेटीमुळे नागपुरातील विद्यार्थी प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत.




