Published On : Sat, May 5th, 2018

अर्थ डे नेटवर्कच्या स्पर्धेत ४८ शहरांत नागपूर अव्वल

नागपूर: पर्यावरण संरक्षणासाठी जगभरात कार्यरत असलेल्या अर्थ डे नेटवर्कच्या माध्यमातून भारतातील शहरांसाठी ‘शहर ग्रीन करो’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १० लाखाच्या वर लोकसंख्या असलेल्या देशातील एकूण ४८ शहरांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत नागपूर शहराचा समावेश विजेत्या पहिल्या दहा शहरांमध्ये झाला आहे. महाराष्ट्रातील तीन शहरांचा या यादीत समावेश असून नागपूरपाठोपाठ मुंबई आणि पुणे शहरानेही यात स्थान पटकाविले आहे.

पर्यावरण संरक्षणासाठी ‘अर्थ डे नेटवर्क’ नामक आंतरराष्ट्रीय संस्था सन १९७० पासून कार्यरत आहे. वसुंधरा वाचविण्याचा संदेश देत वर्षभर पर्यावरणविषयक जनजागृतीचे उपक्रम जगभरात राबविले जातात. याच संस्थेच्या माध्यमातून नागपुरात नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशन वर्षभर पर्यावरणविषयक जनजागृतीसंदर्भात उपक्रम राबवित असतात. नदी स्वच्छता मोहीम, ऊर्जा बचतीसाठी पोर्णिमा दिवस, शहर स्वच्छतेसाठी स्वच्छता अभियान, ओला आणि सुका कचरा विलगीकरण, प्लास्टिकमुक्ती, पर्यावरणपूरक गणेशोत्सवअंतर्गत तलाव संरक्षण, हरितम्‌ नागपूर (वृक्षारोपण) आणि पर्यावरण शिक्षण आदी पर्यावरणाशी संबंधित उपक्रम राबविले जातात. मागील वर्षीपासून अर्थ डे नेटवर्क या संस्थेला ४७ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘शहर ग्रीन करो’ ही स्पर्धा सुरू केली. मागील वर्षी ४७ शहरांसाठी तर यावर्षी ४८ शहरांसाठी ही स्पर्धा होती. या स्पर्धेत आग्रा, अहमदाबाद, अलाहबाद, अमृतसर, भोपाल, दिल्ली, बेंगुलुरु, भुवनेश्वर, चंडीगड, नागपूर, कोलकाता, ग्वालियर, हैद्राबाद, इंदौर, जयपूर, कानपूर, कोचीन, रांची, मदुराई, मुंबई, पुणे, तिरुवंतपुरम्‌, सुरत, वडोदरा, वाराणसी, विजयवाडा, विशाखापट्टणम आदी मोठी शहरे सहभागी झाली होती. या प्रत्येक शहरांमध्ये स्थानिक पर्यावरण प्रेमी संस्थांनी अर्थ डे नेटवर्कच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले. ज्या शहरातील उपक्रमांची व्याप्ती मोठी होती, त्या उपक्रमांच्या माध्यमातून प्रभावी जनजागृती झाली, या जनजागृतीचा लोकजीवनावर प्रभाव पडला अशा दहा शहरांना ‘शहर ग्रीन करो’ स्पर्धेचेन विजेता घोषित करण्यात आले.

Advertisement

विजेत्या शहरांमध्ये समाविष्ट शहरे
‘शहर ग्रीन करो’ स्पर्धेत सहभागी असलेल्या दहा शहरांमध्ये नागपूर, मुंबई, पुणे, वाराणसी, नवी दिल्ली, अमृतसर, श्रीनगर, चेन्नई, गुवाहाटी, बेंगलुरु यांचा समावेश आहे. या दहा विजेत्यांमधील नागपूर हे एकमेव असे शहर आहे ज्यामध्ये पर्यावरणविषयक जनजागृतीमध्ये पर्यावरणवादी संस्थेसोबत स्थानिक स्वराज्य संस्थेचा सहभाग आहे. नागपुरातील ग्रीन व्हिजील फाऊंडेशन या पर्यावरणवादी संस्थेसोबत नागपूर महानगरपालिकेचा सहभाग आहे. अर्थ डे नेटवर्क दक्षिण आशियाच्या विभागीय संचालक श्रीमती करुणा सिंग यांनी या पुरस्काराबद्दल नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे अभिनंदन केले आहे. भविष्यात नागपुरात पर्यावरण जनजागृतीसंदर्भात मोठी क्रांती दिसून येईल, असेही त्या म्हणाल्या.

नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा : नंदा जिचकार, महापौर
पर्यावरणविषयक कार्यात ‘अर्थ डे नेटवर्क’ने नागपूरला दिलेला हा बहुमान म्हणजे येथील पर्यावरणवाद्यांच्या कार्याला मिळालेला सन्मान आहे. हा संपूर्ण नागपूरकरांचा सन्मान आहे. नागपूरकर आता स्वच्छतेविषयी आणि पर्यावरण रक्षणाविषयी जागरुक झाले आहे. या पुरस्कारामुळे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

नागपूरचा सन्मान वाढला : अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी
कुठल्याही समस्येवर मात करायची असेल तर जनजागृती आणि लोकसहभाग महत्त्वाचा असतो. पर्यावरणविषयक जनजागृती करण्यासाठी नागपुरातील ग्रीन व्हिजील फाऊंडेशन नेहमीच पुढाकार घेते. नागपूर महानगरपालिका त्यांच्या खांद्याला खांदा लावून या उपक्रमात सहभागी झाली. या पुरस्काराने आता जबाबदारी आणखी वाढली आहे. जिल्हाधिकारी या नात्याने आता संपूर्ण जिल्हाभरात असे उपक्रम राबविण्याचा आपला प्रयत्न राहील.

हा नागपूरकरांचा सन्मान : कौस्तभ चॅटर्जी, संस्थापक, ग्रीन व्हिजील फाऊंडेशन
‘अर्थ डे नेटवर्क’ ही जागतिक स्तरावर कार्य करणारी संस्था आहे. अशा पुरस्कारांमुळे कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळते. ग्रीन व्हिजील फाऊंडेशन योग्य दिशेने वाटचाल करीत असल्याचे हे प्रमाणपत्र आहे. यामुळे आता पुढील उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा आमचा प्रयत्न राहील. नागपूर महानगरपालिकेचे तत्कालिन आयुक्त अश्विन मुदगल यांच्या नेतृत्वात संपूर्ण अधिकारी-कर्मचारी यांनी आम्हाला जे सहकार्य केले त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. हा सन्मान खऱ्या अर्थाने नागपूरच्या जनतेचा आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement