Published On : Sat, May 5th, 2018

Video: जरूर अनुभवा, कडक उन्हाळ्यात सुखावणारी नागपूर मेट्रोची आल्हाददायक ‘जॉयराईड’ !

नागपूर: माझी मेट्रो, नागपूर मेट्रो, ग्रीन मेट्रो अश्या वेगवेगळ्या नावांनी नागपूर शहरात सातत्याने ‘मेट्रो’ची चर्चा आहे. नागपूरकरांच्या खास मागणीवरून नुकत्याच मेट्रोच्या जॉयराईड्स सुरु करण्यात आल्या. शुक्रवारी पत्रकार बांधवांसाठी मेट्रोच्या अश्याच एका खास जॉयराईडचे आयोजन करण्यात आले होते. साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्थानक ते खापरी मेट्रो स्थानक अशी ही ५ किमीची सफर होती.

अतिशय चकचकीत आणि फ्रेश असा नागपूर मेट्रोचा लूक कोणालाही आवडेल असाच आहे. मेट्रोचे अंतरंग अद्ययावत सोयींनी युक्त आहेत. मेट्रोच्या कोचेसवर बाहेरील बाजूने वाघ, झाडे आणि वेलींची चित्रे व नक्षी चितारलेली आहे. तसेच खापरी स्थानकावर अगदी जिवंत भासणारे असे जंगलातून निघणाऱ्या वाघाचे ३ डी पेंटिंग आणि खाली भूमिगत तळावर नागपूर शहरातील प्रेक्षणीय स्थळांचे एक सुंदर पेंटिंग आहे. येथे एक सीसीटीव्ही सर्व्हेलन्स रूम देखील आहे. जेथून संपूर्ण मेट्रोच्या परिचालनावर लक्ष ठेवले जाईल.

न्यू एअरपोर्ट स्थानकावर सांची स्तूपाच्या धर्तीवर घुमटाकृती डिझाईन तयार केले असून सदर घुमटाच्या अगदी खाली तथागत गौतम बुद्धांची एक विलक्षण मनमोहक प्रतिमा बसविण्यात आली आहे.


Nagpur Metro Joy Ride

तिन्ही स्थानकांवर ग्राहक सेवा कक्ष, प्रसाधनगृहे, चेक इन कॉउंटर्स आणि प्रवाशांची व त्यांच्या सामानाची अंगझडती घेण्यासाठी मशिन्स व सुरक्षारक्षक तैनात आहेत. त्याचप्रमाणे एलसिडी स्क्रीन्सवर स्थानक व तेथे पोहोचण्यासाठी लागणारा वेळ यांची माहिती झळकत असते.

एकूणच पाहता मेट्रोची ही नवलाई नागपूरकरांना एका स्वप्नवत जगाची सफर घडवते. जर तुम्ही मेट्रोची ही सफर अनुभवली नसेल तर अवश्य जा. कारण बाहेर आग ओकणाऱ्या उन्हाळ्यात मेट्रोची ही मुशाफिरी तुम्हाला हळुवारपणे सुखावून जाईल.

Nagpur Metro Joy Ride

Nagpur Metro Joy Ride

Lord Buddha

Nagpur Metro Joy Ride

—Swapnil Bhogekar