नागपूर : नागपुरातील हजारीपहाड येथील याराना हॉटेल, फेट्री येथील द हट आणि फ्रेंड्स कॉलनी येथील इंडियन तंदूर या तीन हॉटेलांचे अन्न परवाने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) रद्द केले आहेत. अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत झालेल्या उल्लंघनांमुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
अन्याय निवारण मंचाच्या अध्यक्षा ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी सामाजिक कार्यकर्ते राम सोलंके, मंगेश गायकवाड, महेश उईके आणि सहकाऱ्यांसह संबंधित आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार संबंधित तीन हॉटेलांचे अन्न परवाने रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
ज्वाला धोटे यांनी या कारवाईचे स्वागत करत अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होत असल्याचे म्हटले. तसेच तातडीने निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी अन्न व औषध प्रशासनाचे आभार मानले.
दरम्यान, ज्वाला धोटे यांनी असा आरोप केला आहे की, संबंधित तीनही हॉटेले अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील नागरिकांच्या तसेच शासकीय जमिनींवर बेकायदेशीरपणे उभारण्यात आली आहेत. हरीश ग्वालबंशी, प्रेम ग्वालबंशी, शैलेश ग्वालबंशी आणि इतरांवर या जागांवर हॉटेल्स विकसित करून भाड्याने दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच या आस्थापनांकडे बांधकाम परवानगी, अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र (फायर एनओसी) आणि भोगवटा प्रमाणपत्र नसल्याचाही दावा त्यांनी केला आहे.
या आरोपांबाबत संबंधित हॉटेल मालक किंवा संबंधित व्यक्तींची बाजू अद्याप समोर आलेली नाही.
अन्याय निवारण मंचाने भूमाफियांविरोधातील लढा पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करत नागरिकांच्या जमिनी, सार्वजनिक मालमत्ता आणि अन्नसुरक्षेच्या संरक्षणासाठी कायदेशीर मार्गाने संघर्ष सुरूच राहणार असल्याचे म्हटले आहे.




