Published On : Fri, May 4th, 2018

महाराष्ट्र तोडणा-यांविरुद्ध राजद्रोहाची कारवाई करावी : प्रकाश जाधव

नागपूर: विदर्भाच्या नावावर राज्य तोडण्याची भाषा बोलणा-यांविरुद्ध राजद्रोहाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश जाधव यांनी केली आहे.

विदर्भाच्या विकासाच्या नावावर महाराष्ट्राला तोडण्याची भाषा अ‍ॅड. श्रीहरी अणे, माजी पोलीस महासंचालक प्रबीरकुमार चक्रवर्ती आणि काही वकील मंडळी करीत आहे. विदर्भाच्या आंदोलनातील काही वकील मंडळी सरकार क्षेत्र, प्राधिकरण, महापालिका, नगरपालिका, बँका, कृषी, श्रमविभाग अशा सर्व शासकीय व अशासकीय व्यवस्थेवर पॅनलवर कार्य करीत आहे. ही मंडळी राज्याच्या सर्व सुखसोई, वेतन, भत्ते याचा लाभ मिळवित आहे. त्यांना पॅनलवरून काढून, त्यांची चौकशी करून, राजद्रोहाची कारवाई होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

आपले हक्क मिळविण्यासाठी ‘मतांचा’ अधिकार वापरून त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी. प्रबीरकुमार चक्रवर्तीसारखे लोक पदावर असताना काहीच करू शकले नाही, आता वेगळा विदर्भ पाहिजे म्हणतात हे चुकीचे आहे. राज्य तोडण्याची भाषा करणाऱ्यांची गय आता शिवसेना करणार नाही, आम्हीसुद्धा अखंड महाराष्ट्रासाठी रस्त्यावर उतरू, असा इशारा प्रकाश जाधव यांनी दिला. पत्रकार परिषदेला किशोर पराते, रमेश मिश्रा, रमेश बक्षी, डॉ. रामचरण दुबे, मंगेश कडव उपस्थित होते.