नागपूर: शहरातील नाग नदी, पिवळी नदी, तसेच पोरा नदीमधून पावसाचे पाणी थांबणार नाही तसेच पूर परिस्थितीत निर्माण होणार नाही यासाठी नद्यांच्या स्वच्छता अभियानाला 7 मे पासून सुरुवात होत असून नद्यांच्या स्वच्छता अभियानामध्ये स्वयंसेवी संस्था व उद्योजकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.
बचतभवन येथे संसद जल व पर्यावरण रक्षण योजनेअंतर्गत नदी सफाई अभियानाची बैठक आयोजित करण्यात आली होती. याबैठकीस आमदार प्रा. अनिल सोले, महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष विरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, अतिरिक्त महानगर पालिका आयुक्त रविंद्र कुंभारे, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, मुख्य अभियंता मनोज तालेवार आदी उपस्थित होते.
संसद जल व पर्यावरण रक्षण योजनेअंतर्गत शहरातील तीन प्रमुख नद्यांचे स्वच्छता अभियान मे व जून या महिन्यात राबविण्यात येत असून या अभियानासाठी विविध यंत्रणा, स्वयंसेवी संस्था तसेच उद्योजक व सीएसआर व निधीमधून या कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. दरवर्षी अतिवृष्टी व पूरामुळे नद्यांचा प्रवाह बंद होत असल्यामुळे पूराची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे नद्यांची सफाई करण्यात येणार असून पावसाचे पाणी कुठेही थांबणार नाही या दृष्टीने नद्यामधील गाळ काढून खोलीकरण व रुंदीकरणाचे काम करण्यात येणार आहे. यासाठी पोकलॅण्ड व जेसीपी सारख्या यंत्राची आवश्यकता आहे. यासाठी लोकसहभाग देण्याचे आवहन यावेळी करण्यात आले.
नद्यांच्या सफाई व खोलीकरणाचे काम मागील वर्षी सुध्दा करण्यात आले आहे. यामध्ये नाग नदीची लांबी 18 किलोमीटीर, पिवळी नदी 17.5 कि.मी. तर पोरा नदीची लांबी 12 कि.मी. आहे. मागील वर्षी या नद्यांमधून 1 लक्ष 33 हजार मेट्रीक टन गाळ व कचरा 450 टिप्पर काढण्यात आले. यासाठी 10 पोकलॅण्डचा वापर करण्यात आला असून यासाठी 50 हजार लिटर डिझेलचा वापर झाला आहे. यावर्षी सुध्दा 15 पोकलॅण्डची आवश्यकता असून तिन्ही नद्यातील गाळ काढणे, तसेच खोलीकरण व रुंदीकरणाचे काम करण्यात येणार आहे. हे अभियान मागील चार वर्षापासून सातत्याने राबविण्यात येत आहे.
संसद जल व पर्यावरण रक्षण योजनेअंतर्गत नदी सफाई अभियान बैठकीस मेट्रोचे जनरल मॅनेजर, भारतीय रस्ते महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, डब्ल्यूसीएल, नागपूर सुधार प्रन्यास, भारतीय रस्ते महामार्ग प्राधिकरण, हॉटेल असोसिएशन, हॉटमिक्स प्लॉन्ट असोसिएशन, क्रिडाई, आरकिटेक असोसिएशन, किराणा मटरियल असोसिएशन, मंगल कार्यालय असोसिएशन आदी उपस्थित होते.

