
नागपूर :नागपुरातील कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका २५ वर्षीय तरुणीच्या घरात घुसून तिचा बाथरूमपर्यंत पाठलाग करत अश्लील कृत्य केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विरोध केल्यानंतर आरोपीने चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या साथीदाराला अटक केली असून मुख्य आरोपी आरिफ अली अद्याप फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आपल्या घराजवळ किराणा दुकान चालवते. घटनेच्या वेळी ती घरातील बाथरूममध्ये असताना मुख्य आरोपी आरिफ अली हा विनापरवानगी घरात शिरला. त्याने बाथरूमच्या दरवाजापर्यंत जाऊन तरुणीशी अश्लील वर्तन केले. तरुणीने विरोध करताच आरोपीने चाकू काढून जीवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, तरुणीचा आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा होऊ लागले. त्याचवेळी आरोपीचा साथीदार प्रमोद मेश्राम तेथे आला. त्याने घराबाहेर उभे राहून शिवीगाळ केली तसेच पोलिसांत तक्रार केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली. त्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
पीडितेच्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी प्रमोद मेश्राम याला अटक केली असून मुख्य आरोपी आरिफ अली याचा कसून शोध सुरू आहे.




