
नागपूर : मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलातील महत्त्वाकांक्षी ‘नागपूर स्पोर्ट्स हब’ प्रकल्पाच्या विकासकामांना गती देण्याच्या दृष्टीने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. प्रकल्पाचे बांधकाम भविष्यकालीन गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने करण्याच्या सूचना बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
‘नागपूर स्पोर्ट्स हब’अंतर्गत नव्याने उभारण्यात येणाऱ्या ११ प्रेक्षागृहांच्या कामाची सरासरी ४४ टक्के प्रगती झाली आहे. यापैकी स्पोर्ट्स कॅफेटेरियाचे काम तब्बल ८० टक्के पूर्ण झाले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचा ऑलिम्पिक आकाराचा जलतरण तलाव उभारण्याचे कामही वेगाने सुरू आहे.
प्रकल्पात जुन्या झाडांचे संरक्षण करण्यासाठी इमारतींच्या आराखड्यात बदल करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. तसेच संकुलात उच्च दर्जाचे पथदिवे, सौर ऊर्जा प्रणाली, सीसीटीव्ही आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसार विद्युत व्यवस्था उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. विविध सुधारणा आणि प्रमाणीकरणाच्या निकषांमुळे प्रकल्पाची सुधारित किंमत १,१४४.३६ कोटी रुपये झाली आहे.
दरम्यान, जुन्या इनडोअर हॉलची दुरुस्ती, वुडन फ्लोअरिंग, वातानुकूलन, अग्निशामक यंत्रणा, ४०० मीटर सिंथेटिक ट्रॅक आणि पॅव्हेलियनच्या अद्ययावतीकरणासाठी ९१.८८ कोटी रुपयांच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. ‘मिशन लक्षवेध’अंतर्गत विभागीय निपुणता केंद्र, स्पोर्ट्स सायन्स सेंटर आणि राज्यस्तरीय बॅडमिंटन उच्चस्तरीय प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. युवा वसतिगृह आवश्यक सुविधांसह लवकरच कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.




