
नागपूर : सोनेगाव तलावात शुक्रवारी सकाळी एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृताची ओळख अजय कुवरलाल कटरे (३०) अशी झाली आहे. अजय हा सोनेगाव वस्ती परिसरात कुटुंबासह राहत असून गायत्री हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करत होता.
गुरुवारी सकाळपासून अजय घरातून बेपत्ता होता. कुटुंबीयांनी परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र, त्याचा ठावठिकाणा न लागल्याने पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी सोनेगाव तलावाच्या पाण्यात युवकाचा मृतदेह तरंगताना स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला. नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून स्थानिक गोताखोरांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. चौकशीत मृतदेह अजय कटरे याचा असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. अजयने आत्महत्या केली की त्याच्या मृत्यूमागे अन्य काही कारण आहे, याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे.




