
नागपूर : काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये वंदे मातरमची केवळ दोन कडवी म्हणण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. काँग्रेसची ही भूमिका संविधानविरोधी असून, त्यातून मानसिक गुलामगिरीची प्रवृत्ती दिसून येते, अशी टीका त्यांनी केली.
नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, काँग्रेसच्या कार्यकारिणीने १९३७ मधील ठरावानुसार पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये वंदे मातरमची दोनच कडवी म्हणण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र, स्वतंत्र भारतात संसदेला घटनात्मक अधिकार असून, संसदेच्या निर्णयांचा आदर करणे आवश्यक आहे. जुन्या निर्णयाच्या आधारे राष्ट्रीय गीताच्या सादरीकरणावर मर्यादा आणणे योग्य नाही, असे त्यांनी सांगितले.या निर्णयातून काँग्रेसची मानसिकता आणि संविधानाबाबतची भूमिका स्पष्ट होत असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला.
दरम्यान, ‘छात्रों की गूंज’ उपक्रमासाठी राहुल गांधी पुणे दौऱ्यावर येणार असल्याबाबतही फडणवीस यांनी भाष्य केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम स्वागतार्ह आहे; मात्र हा संवाद नियंत्रित वातावरणाऐवजी सर्व विद्यार्थ्यांसोबत मुक्तपणे झाला असता तर अधिक चांगले झाले असते, अशी भूमिका त्यांनी मांडली.




