नागपूर – नागपूर शहरातील प्रत्येक क्षेत्राचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आज राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संस्था नागपुरात आहेत. नामांकित आयटी कंपन्या मिहानमध्ये आल्या. त्यामुळे ६८ हजार तरुणांना रोजगार मिळाला. या शहराला प्रदूषणमुक्त करून ‘ग्रीन सिटी’ म्हणून विकसित करण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत. आणि आता जनतेच्या सहकार्यानेच नागपूरला देशातील क्रमांक एकचे शहर करायचे आहे, असा निर्धार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शुक्रवार) व्यक्त केला.
केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी व राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर महानगरपालिकेच्या वतीने दक्षिण-पश्चिम नागपूर व पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघ येथील सिमेंट काँक्रीट रस्ते, सोनेगांव तलावाचे सौंदर्यीकरण व ई-बसेसचे तसेच विविध आयुष्मान आरोग्य मंदिराचे लोकार्पण व भूमिपूजन शुक्रवारी झाले. राजे संभाजी चौक (नागोबा मंदिर चौक) येथे आयोजित कार्यक्रमाला आमदार प्रविण दटके, आमदार विकास ठाकरे, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, माजी आमदार नाना शामकुळे, श्री. जितेंद्र (बंटी) कुकडे, माजी महापौर श्री. संदीप जोशी, श्री. अनिल सोले, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, मुख्य अभियंता श्री. राजीव गायकवाड यांची उपस्थिती होती.
ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘नागपूर शहराचा चौफेर विकास होत आहे. शहरातील तलावांचे सौंदर्यीकरण होत असून ऑक्सिजन पार्क आणि पर्यटनासाठी उत्तम असे तलाव शहरभर निर्माण होत आहेत. अशाच सोनेगाव तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या कामाचेही आज लोकार्पण करण्यात आले आहे. नागपूरसह संपूर्ण जिल्ह्याचा प्रत्येक क्षेत्रात विकास व्हावा, यासाठी अनेक विकासकामे सुरू झालेली आहेत.’ राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘अपारंपारिक स्त्रोत व ग्रीन एनर्जीवर आधारित वाहतूक व्यवस्था उभारणारे नागपूर शहर हे देशातले पहिले शहर व्हावे असा प्रयत्न आहे. नागपूर हे आज आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर म्हणून नावलौकिक मिळवीत आहे.
ग्रीन सिटी असणाऱ्या नागपूर शहरला डिझेल आणि पेट्रोल सारख्या पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांच्या वापरापासून थांबविण्याचा मानस आहे.’ यावेळी सिमेंट रस्ते, ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पातील वाणिज्य आणि रहिवासी संकुल, गोरेवाडा व प्रतापनगर जलकुंभ, सार्वजनिक स्मार्ट टॉयलेट, व्हर्टिकल गार्डन, ई- बसेस, आरोग्य मंदिर, ग्लो गार्डन, अहिल्याबाई होळकर सभागृह, छत्रपती शाहू महाराज रिसर्च इन्स्टिट्यूट, पंडित दीनदयाल उपाध्याय व राष्ट्रमाता कस्तुरबा ग्रंथालयांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले तर आभार जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी मानले.