
नागपूर : नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कलमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरस्वती नगर परिसरात देहव्यापाराविरोधात छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत देहव्यापार चालवत असल्याच्या आरोपावरून एका महिला संचालिकेला अटक करण्यात आली असून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने दोन पंच आणि बनावट ग्राहकाच्या मदतीने कलमना वस्तीतील एका घरावर छापा टाकला. कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले, तर तेथून एका पीडित महिलेची सुरक्षित सुटका करण्यात आली.
प्राथमिक तपासात आरोपी महिला आर्थिक फायद्यासाठी महिलांना अल्पावधीत अधिक पैसे मिळण्याचे आमिष दाखवून देहव्यापार करण्यास प्रवृत्त करत होती. तसेच ग्राहकांची व्यवस्था करून देहव्यापाराचा व्यवसाय चालवत असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी कलमना पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेला पुढील कारवाईसाठी कलमना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.




