
नागपूर : जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजकुमार केवलरामानी शाळेत बुधवारी एक हृदयद्रावक घटना घडली. मध्यंतराच्या वेळी तिसरीत शिकणारा आठ वर्षीय विद्यार्थी अचानक शाळेच्या व्हरांड्यात कोसळला. शाळा प्रशासनाने तत्काळ त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे शाळा परिसरासह संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत विद्यार्थ्याची ओळख हनित शालीग्राम कटरे (वय ८, रा. समतानगर) अशी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी त्याची आई त्याला नेहमीप्रमाणे शाळेत सोडून गेली होती. मध्यंतरादरम्यान तो वर्गाबाहेर आला असता अचानक व्हरांड्यात कोसळला. शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने त्याला जवळच्या रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला असून, शवविच्छेदन अहवालानंतरच विद्यार्थ्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, या धक्कादायक घटनेनंतर संतप्त नागरिकांनी शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भातील उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे आणि निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.




