
नागपूर : विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी परिवहन विभागाने स्कूल बस तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे. नागपूर शहरात वर्षभरात तब्बल १,७२९ स्कूल बसची तपासणी करण्यात आली. यामध्ये २७७ वाहनांमध्ये मोटार वाहन कायदा व संबंधित नियमांचे उल्लंघन आढळून आले. या वाहनांवर ई-चलानसह विविध प्रकारची कारवाई करण्यात आली.
तपासणीदरम्यान स्कूल बसचे परमिट, वैध योग्यता प्रमाणपत्र, विमा, अग्निशामक यंत्र, फिटनेस, विद्यार्थ्यांची निर्धारित क्षमता तसेच बसमधील विद्यार्थ्यांची संख्या यासह विविध सुरक्षा निकष तपासण्यात आले. गंभीर त्रुटी आढळल्याने १० स्कूल बस जप्त करण्यात आल्या.
काही बस वैध योग्यता प्रमाणपत्राशिवाय विद्यार्थ्यांची वाहतूक करत असल्याचेही समोर आले. अशा वाहनांवर परिवहन विभागाने कठोर कारवाई केली. नियमांचे पालन न करणाऱ्या ४४ स्कूल वाहनांचे परमिट व नोंदणी कायमस्वरूपी रद्द करण्यात आली आहे.
पॅनिक बटन, सीसीटीव्ही आणि व्हीएलटीडी बंधनकारक-
१६ जुलै २०२६च्या अधिसूचनेनुसार स्कूल बस नियमावलीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार स्कूल बसमध्ये पॅनिक बटन, व्हीएलटीडी (व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस), सीसीटीव्ही तसेच फायर डिटेक्शन आणि अलर्ट सिस्टम बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. या नव्या सुरक्षा व्यवस्थांची पूर्तता करण्यासाठी वाहनचालकांना तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
क्षेत्रीय परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही विभागाची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सांगितले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या स्कूल बसवर पुढील काळातही ई-चलान, जप्ती आणि परमिट रद्द करण्याची कारवाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.




