
नागपूर : नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिट अँड रनची धक्कादायक घटना घडली. हिंगणा रोडवरील राजीव नगर बसस्टॉपजवळ फुटपाथवर झोपलेल्या युवकाला अज्ञात चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात युवकाचा जागीच मृत्यू झाला. धडकेनंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला.
मृताची ओळख ३० वर्षीय मुकेश कनसरे, रा. बालाघाट, मध्य प्रदेश अशी झाली आहे. मुकेश मागील सुमारे एक वर्षापासून नागपुरात काम करून उदरनिर्वाह करत होता. तो अनेकदा रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथवर झोपत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
२१ सप्टेंबरच्या रात्री राजीव नगर बसस्टॉपजवळ रॉयल हॉटेल परिसरात मुकेश फुटपाथवर झोपला असताना अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की, मुकेश गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावला.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे वाहनाची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.




