
नागपूर : सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादात एका तरुणावर तलवारीने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मानेवर तलवारीचा वार होताच तरुणाने हात पुढे करून तो अडवला. त्यामुळे त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी सक्करदरा पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
ही घटना सिंधीबन कॉलनी, मोठा ताजबाग परिसरात घडली. जखमी तरुणाची ओळख मोहम्मद शाकीर मोहम्मद इकबाल अशी झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शाकीर त्याचे दिलेले पैसे परत घेण्यासाठी तक्रारदार शेख सोहेल याच्याकडे गेला होता. त्यावेळी काही जणांमध्ये वाद सुरू होता. शाकीर भांडण करण्याच्या उद्देशाने आल्याचा गैरसमज आरोपी सय्यद खानू उर्फ पटेल आणि सय्यद सरदार उर्फ युनूस सय्यद खलील यांना झाला.
आरोप आहे की, दोघांनी शाकीरला पकडले. त्यानंतर सरदार उर्फ युनूस याने घरातून तलवार आणून शाकीरच्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. शाकीरने हात पुढे करून वार अडवल्याने त्याच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली. दुसरा वार करण्यापूर्वी तक्रारदाराने मध्यस्थी करून वाद थांबवला. त्यानंतर आरोपी धमकी देत घटनास्थळावरून पसार झाले.
जखमी शाकीरवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सक्करदरा पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. आरोपी सय्यद खानू उर्फ पटेल याच्याविरुद्ध यापूर्वीही गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.




