
नागपूर : सीताबर्डीतील लक्ष्मी भवन चौक परिसरातील ‘सेकंड फ्लोअर कॅफे’ या हुक्का पार्लरवर क्राईम ब्रांचने रात्रीच्या सुमारास धाड टाकली. क्राईम ब्रांच युनिट-२, युनिट-३ आणि एनडीपीएस पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली.
पोलिसांचे पथक पोहोचताच पार्लरला बाहेरून कुलूप लावण्यात आले. मात्र, पंचांच्या उपस्थितीत पोलिसांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. यावेळी २३ ग्राहक प्रतिबंधित तंबाखूयुक्त हुक्का ओढताना आढळून आले.
कारवाईत १९ हुक्का पॉट, १० पाइप, २० चिलम आणि प्रतिबंधित तंबाखूचे पाकीट असा एकूण २ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सनी विकास बोरकर, सार्थक बाबाराव पखाले आणि हर्ष नरेश दुर्वे या तिघांना अटक करण्यात आली.
तसेच २३ ग्राहक आणि जागा मालकाविरुद्धही कारवाई करण्यात आली असून, सीताबर्डी पोलीस ठाण्यात कोटपा कायद्यासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




