नागपूर : अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आणि वादांनंतर अखेर मानकापुर फ्लायओव्हरचा दुसरा भाग दुरुस्ती पूर्ण करून नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. बुधवारी अधिकृतपणे हा भाग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला. नवरात्रीपूर्वीच हा निर्णय झाल्याने शहरवासीयांसह भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दुरुस्तीची पार्श्वभूमी-
मे २०२५ मध्ये फ्लायओव्हरची तपासणी झाल्यानंतर त्यात संरचनात्मक तडे आढळले होते. त्यानंतर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. या काळात तीन स्पॅन बदलून नवीन काँक्रीटीकरण करण्यात आले. सप्टेंबर २०२५ पर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य होते.
मात्र दुरुस्तीच्या काळात सुरक्षा उपाययोजनांचा अभाव आणि निष्काळजीपणा दिसून आला. कोराडी रोड हा शहराचा महत्त्वाचा मार्ग असल्याने दररोज हजारो वाहनं या मार्गाने जातात. फ्लायओव्हरचा एक भाग बंद असल्यामुळे दुसऱ्या बाजूला मोठी गर्दी होत होती आणि अपघातांची संख्याही वाढली होती.
भीषण अपघातानंतर दबाव वाढला-
अलिकडेच फ्लायओव्हरवर शाळेची बस आणि वॅन यांच्यात भीषण धडक झाली होती. या अपघातात वॅन चालक आणि एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला, तर नऊ मुलं गंभीर जखमी झाली होती. या घटनेनंतर फ्लायओव्हर तातडीने खुला करण्याची मागणी अधिक जोर धरू लागली.
नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर निर्णय-
कोराडी देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक नागपूरसह आसपासच्या जिल्ह्यांतून येतात. फ्लायओव्हर बंद राहिल्यास नवरात्रीदरम्यान वाहतुकीत मोठा गोंधळ होणार असल्याची शक्यता होती. नागरिकांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर अखेर बुधवारी दुसरा भाग खुला करण्यात आला.
नागरिकांना दिलासा-
फ्लायओव्हर पूर्णपणे सुरू झाल्याने दररोज या मार्गाने जाणाऱ्या वाहनधारकांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. वाहतुकीची कोंडी व अपघातांची शक्यता कमी झाली असून नवरात्रीपूर्वीच हा निर्णय झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.