नागपूर: सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन करणारी आणि कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणारी रील तयार करणे नागपुरातील तीन तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. तहसील पोलिसांनी तिघांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असून त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शाहिद अफजल शकील खान (26), मोहम्मद साहिल मोहम्मद शकील शेख (24) आणि रिजवान मोहम्मद अजीज (28) अशी आहेत.
“शहर के कमिश्नर तो हम ही लोग है…” रील व्हायरल
पोलिसांच्या माहितीनुसार, सुमारे वर्षभरापूर्वी या तिघांनी इंस्टाग्रामवर एक रील पोस्ट केली होती. त्यामध्ये, “पोलीस चौकी के हिसाब से शहर बांट रहे हो सुलतान… चौक चाहे पुलिस की हो, शहर के कमिश्नर तो हम ही लोग है…” असा संवाद वापरण्यात आला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
पोलिसांचे म्हणणे आहे की, या प्रकारच्या रीलमुळे समाजात चुकीचा संदेश जात असून कायदा-सुव्यवस्थेला आव्हान निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तपास सुरू करण्यात आला.
पोलिसांसमोर माफी मागितली
कारवाईनंतर आरोपींचा आणखी एक व्हिडिओ समोर आला असून त्यात ते पोलिसांसमोर कान पकडून उठाबशा काढत माफी मागताना दिसत आहेत. पोलिसांच्या कारवाईनंतर सोशल मीडियावरील त्यांची डायलॉगबाजी थांबली असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
गंभीर कलमांखाली गुन्हा
तहसील पोलिसांनी तिघांविरुद्ध पोलीस विभागाची प्रतिमा मलीन करणे आणि समाजात चुकीचा संदेश पसरवणे यासह संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.





