अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे शाळा, महाविद्यालयांना शनिवारी सुट्टी
नागपूर: हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशारामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या, शनिवार, ७ सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित दौराही रद्द करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट आले आहे.
अतिवृष्ट्याच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले असून अत्यावश्यक कामांव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये असा सल्लाही देण्यात आला आहे. तसेच या परिस्थितीत घाबरुन जाण्याचे कारण नसून अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे प्रशासनाने म्हटले आहे.
कोणत्याही आपत्तीच्या परिस्थितीत मदतीची गरज असल्यास नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षाच्या १०७७ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा अथवा नागपूर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, आपत्ती व्यवस्थापन कक्ष तसेच एसडीआरएफ व एनडीआरएफ पथकांना कोणत्याही परिस्थितीशी सामोरे जाण्यासाठी सज्ज ठेवण्यात आले असून सर्व विभाग व यंत्रणांना अतिसतर्क राहण्याचे आदेश देण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.