नागपूर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या 18 जुलै रोजी होणाऱ्या ‘रामरक्षा’ आंदोलनापूर्वीच मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. आंदोलनाची सुरुवात रामनगर येथील श्रीराम मंदिरात रामरक्षा पठणाने करण्याचा ठाकरे गटाचा मानस होता. मात्र, मंदिर प्रशासनाने स्पष्ट शब्दांत परवानगी नाकारत मंदिर परिसरात कोणत्याही राजकीय कार्यक्रमास परवानगी दिली जाणार नसल्याचे सांगितले आहे.
विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या श्रीराम मंदिराचे आजीवन सदस्य आहेत. त्यामुळे परवानगी नाकारण्याच्या निर्णयाने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भाजपविरोधात नागपुरातून एल्गार पुकारण्याची तयारी करणाऱ्या ठाकरे गटाला आंदोलनाच्या सुरुवातीलाच मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
आता मंदिरात प्रवेश नाकारल्यानंतर उद्धव ठाकरे आंदोलनाची सुरुवात नेमकी कुठून करणार आणि ठाकरे गटाची पुढील रणनीती काय असेल, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.