नागपूर :नागपूर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी बुधवारी, २९ जुलै २०२६ रोजी नागपूर शहरासह नागपूर ग्रामीण, हिंगणा आणि कामठी तालुक्यातील सर्व सरकारी व खासगी अंगणवाड्या, प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेसना सुट्टी जाहीर केली आहे.
भारतीय हवामान विभागाने २८ ते ३० जुलैदरम्यान नागपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मंगळवारी दुपारी २.३० वाजेपर्यंत नागपूर शहरात तब्बल १०८ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे अनेक भागांत पाणी साचले असून, पुढील २४ तासांत अतिवृष्टी झाल्यास पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला असून, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ आणि शासनाच्या संबंधित परिपत्रकानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश जारी केला आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये, हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.





