नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकाच्या यार्डात मंगळवारी पहाटे एक धक्कादायक घटना घडली. मालगाडीवर चढलेल्या एका अज्ञात तरुणाचा हाय व्होल्टेज करंटच्या संपर्कात आल्याने जागीच मृत्यू झाला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र दुसऱ्या मालगाडीवर उडी घेतल्यानंतर त्याचा दुर्दैवी अंत झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास संबंधित तरुण रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या मालगाडीवर चढला. त्यानंतर तो वरून जाणाऱ्या ओव्हरहेड वीजवाहिनीजवळ पोहोचत असल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. धोका लक्षात येताच त्यांनी तत्काळ त्या मार्गावरील वीजपुरवठा बंद करून तरुणाला सुरक्षित खाली आणण्याचा प्रयत्न सुरू केला.
दरम्यान, तरुणाने अचानक पहिल्या मालगाडीवरून उडी मारत शेजारच्या रुळावरील दुसऱ्या मालगाडीवर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या मार्गावरील वीजपुरवठा सुरू असल्याने तो हाय व्होल्टेज करंटच्या संपर्कात आला. करंटचा तीव्र धक्का बसल्याने तो गंभीर भाजला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) आणि शासकीय रेल्वे पोलीस (जीआरपी) घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून मृत तरुणाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच तो मालगाडीवर कशासाठी चढला आणि या दुर्घटनेमागील नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत.





