नागपूर : दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ गुरुवारी नागपुरातील संविधान चौकात सीजेपीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. सुरुवातीला आंदोलन शांततेत सुरू होते. मात्र, परवानगीची वेळ संपल्यानंतरही आंदोलक ठिय्या देऊन बसल्याने घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि काही काळ गोंधळ उडाला.
घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी आंदोलकांना वारंवार शांततेत आंदोलन स्थळ रिकामे करण्याचे आवाहन करताना दिसून आले. परवानगीची वेळ संपल्याची माहिती देत त्यांनी सध्याच्या हवामानाच्या परिस्थितीचा उल्लेख केला आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तेथून निघण्याची विनंती केली. मात्र, आंदोलक ठिय्या आंदोलनावर कायम राहिल्यानंतर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली.
त्यानंतर नागपूर पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना प्रतिबंधात्मक ताब्यात घेण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या कारवाईदरम्यान आंदोलकांनी एकत्र उभे राहत ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत गायले. राष्ट्रगीताच्या सुरांनी संविधान चौक दुमदुमून गेला आणि आंदोलनाचा शेवट भावनिक वातावरणात झाला.
घटनास्थळावरील व्हिडिओंमध्ये पोलिस आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत असताना सर्वजण राष्ट्रगीत गात असल्याचे दिसून येते. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून विविध स्तरांतून त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत.
दरम्यान, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठीच ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून ताब्यात घेतलेल्या आंदोलनकर्त्यांवर पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली.





