
नागपूर —संक्रांतीच्या सणानिमित्त शहरात पतंगोत्सवाची तयारी जोरात सुरू असताना, दरवर्षी नायलॉन मांजामुळे होणाऱ्या गंभीर अपघातांची दखल घेत नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाने कडक मोहिमेला सुरुवात केली आहे. नायलॉन मांजा दुचाकीस्वार, सायकलस्वार तसेच पादचाऱ्यांसाठी प्राणघातक ठरत असून, अनेक प्राणी व पक्ष्यांनाही त्याची झळ बसत आहे.
नागपूर पोलिसांनी नागरिकांना नायलॉन मांजाचा वापर पूर्णतः टाळण्याचे आवाहन करत, त्याऐवजी पारंपरिक सूती मांजाच वापरण्याची सूचना केली आहे. सूती मांजामुळे अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
पोलीस प्रशासनाकडून शहरभर जनजागृती मोहीम राबवली जात असून, पोस्टर लावणे, दुचाकी वाहनांवर संरक्षणात्मक वायर बसवून सुरक्षित वाहनचालना बाबत प्रात्यक्षिके दाखवणे असे विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. तसेच नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू आहे.
पालकांनीही आपल्या पाल्यांना सुरक्षित मांजाचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी नागरिकांना सणाचा आनंद साजरा करताना सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे.








