
नागपूर -: नागपूर महानगरपालिका निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपला जाहीरनामा आज प्रसिद्ध केला. काँग्रेसने जाहीरनाम्यात मोफत पाणी आणि मोफत बससेवेवर भर दिल्यानंतर, भाजपाने मात्र ‘मोफत’ योजनांपेक्षा विकासकेंद्री धोरणावर भर देत नागपूरला देशातील अव्वल महानगर बनवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मनपाच्या बसमध्ये मोफत प्रवासाची सवलत कायम ठेवण्यात आली असून, इतर मोफत योजनांना फाटा देण्यात आला आहे.
रामदासपेठ येथील हॉटेल तुली इम्पीरियल येथे महसूल मंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, आमदार प्रवीण दटके, परिणय फुके, माजी आमदार प्रा. अनिल सोले, सुधाकर कोहले, गिरीश व्यास, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, निवडणूक प्रमुख संजय भेंडे, माजी महापौर नंदा जिचकर आणि भाजप नेते जयप्रकाश गुप्ता यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.
२० वर्षांचा विकासाचा लेखाजोखा-
भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी जाहीरनाम्याची माहिती देताना सांगितले की, मागील २० वर्षांच्या भाजपच्या कार्यकाळात नागपूर शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत. २०१७ मध्ये दिलेली बहुतांश आश्वासने पूर्ण करण्यात आली असून, २४x७ पाणीपुरवठा योजना अद्याप पूर्ण क्षमतेने लागू न झाल्याची कबुलीही त्यांनी दिली. मात्र, भविष्यात संपूर्ण शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
तिवारी यांनी आतापर्यंत झालेल्या कामांचा उल्लेख करताना झोपडपट्टीवासीयांना पट्टे वाटप, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पांना गती, सिंध प्रांतातून आलेल्या सिंधी बांधवांना मालकी हक्क, पाण्याच्या टाक्या, तलाव संवर्धन, उद्याने, मैदाने, सिमेंट रस्ते आणि कचरा प्रक्रिया प्रकल्पांची माहिती दिली.
‘लीज-फ्री’ नागपूरचा संकल्प-
भाजपच्या जाहीरनाम्यात संपूर्ण नागपूर शहर ‘लीज-फ्री’ करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. नासुप्राच्या लेआउटमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सध्या ग्राउंड रेंटसोबत मालमत्ता कर भरावा लागतो. शहर लीज-फ्री झाल्यानंतर नागरिकांवरील ग्राउंड रेंटचा अतिरिक्त बोजा संपुष्टात येईल, असे तिवारी यांनी सांगितले. तसेच नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला गती देणे आणि पोहरा नदीसाठी नवीन सांडपाणी वाहिन्यांचे काम सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
प्रत्येक विधानसभा क्षेत्रात स्किल डेव्हलपमेंट सेंटर-
शहरातील सहा विधानसभा क्षेत्रांमध्ये रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी स्वतंत्र स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स उभारण्यात येणार आहेत. घरगुती उद्योग करणाऱ्या महिलांसाठी महिला बचत गट आणि तेजस्विनी बाजार सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. शंकरनगर येथील जिजाऊ महिला सशक्तीकरण केंद्राची इमारत एका वर्षात पूर्ण करून उद्योजक महिलांसाठी खुली केली जाईल, असेही जाहीर करण्यात आले.
नागपूरमध्ये विदेशी दूतावासाचा प्रयत्न-
नागपूरकरांना परदेशात अडचण आल्यास तात्काळ मदत मिळावी यासाठी शहरात विदेशी दूतावास उभारण्याचा प्रयत्न केला जाईल, असे तिवारी यांनी सांगितले. दूतावास सुरू झाल्यानंतर मनपा आणि जिल्हाधिकारी कार्यालयात ‘वन विंडो’ सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.
रोजगार आणि भविष्यातील नागपूर-
भाजपच्या जाहीरनाम्यात मनपाच्या विविध प्रकल्पांमधून स्थानिक युवकांना रोजगार देण्यावर भर देण्यात आला आहे. कॉलेजपासून करिअरपर्यंत इंटर्नशिपच्या माध्यमातून कौशल्य विकास, संधी आणि नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात येतील. स्टार्टअप्स, फ्रीलान्सिंग, डिजिटल आणि आयटी क्षेत्रातील रोजगारासाठी यूथ हब, ई-लायब्ररी आणि ई-लर्निंग सुविधा देण्याचे आश्वासनही जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.
एकूणच, विकास, रोजगार, पर्यावरणपूरक आणि आधुनिक पायाभूत सुविधांवर भर देत नागपूरला ‘मेट्रोपोलिटन आणि झिरो कार्बन फुटप्रिंट शहर’ बनवण्याचा निर्धार भाजपाने या जाहीरनाम्यातून व्यक्त केला आहे.








