नागपूर : शहरातील फुटपाथ पादचाऱ्यांसाठी मोकळे राहावेत, यासाठी नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेकडून विशेष ‘फुटपाथ फ्रिडम’ मोहीम हाती घेण्यात आली आहे.
वाहतूक विभागाच्या माहितीनुसार, शहरातील विविध बाजारपेठा व गर्दीच्या ठिकाणी हॉकर्स आपली अस्थायी आस्थापने थेट फुटपाथवर उभी करतात. इतकेच नाही, तर या दुकानांमध्ये खरेदीसाठी येणारे ग्राहकही आपली वाहने फुटपाथवर किंवा त्यालगत उभी करतात. परिणामी, पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा न मिळाल्याने त्यांना मुख्य रस्त्यावर उतरून प्रवास करावा लागतो. या धोकादायक परिस्थितीमुळे गंभीर अपघात घडण्याची शक्यता वाढते.
या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या सहकार्याने संयुक्त कारवाई केली. या कारवाईत अनेक अस्थायी आस्थापने हटवण्यात आली. पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की, शहरातील रस्ते व फुटपाथ पादचाऱ्यांसाठी मोकळे ठेवणे ही प्राथमिक जबाबदारी आहे. नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध पुढेही अशीच मोहीम सुरू राहणार आहे.
या मोहिमेमुळे फुटपाथवरून पादचाऱ्यांची वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, असा विश्वास वाहतूक पोलिसांनी व्यक्त केला आहे.









