नागपूर : ऑनलाइन गेमिंगच्यामाध्यमातून नागपूरच्या व्यापाऱ्याची ५८ कोटींची फसवणूक करणारा गोंदियातील आरोपी अनंत ऊर्फ सोंटू जैन याला नागपूर पोलिस फरार घोषित करणार आहेत. इतकेच नाही तर पोलीसांनी त्याच्या मालमत्तेचा लिलाव करण्यासाठी हालचालीही सुरू केल्या आहेत.
पोलिसांनी सोंटूच्या घरातून रोख रक्कम आणि सोन्याचा ३१ कोटी रुपयांचा माल जप्त केला आहे. याशिवाय सुमारे ५० कोटी रुपयांच्या १६ स्थावर मालमत्ताही जप्त करण्यात आल्या आहेत.
सोंटू भारतात येण्याचे टाळत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी त्याला फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. फरार घोषित केल्यानंतर सोंटूला पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी वेळ देण्यात येणार आहे. त्यानंतर त्याची मालमत्ता जप्त करून लिलाव करण्यात येईल.
माहितीनुसार, २१ जुलै रोजी नागपूर पोलिसांनी सोंटू जैन विरोधात फसवणूक आणि आयटीआय कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. त्याअगोदरच तो दुबईला पळून गेला होता. तो एका महिन्याच्या टुरिस्ट व्हिसावर दुबईला गेला होता. गेल्या आठवड्यात त्याने व्हिसाची मुदत १४ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. त्याने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. तो न्यायालयाने फेटाळला असल्याची माहिती आहे.