नागपूर : धारमपेठ परिसरात रात्री उशिरा डीजेचा आवाज त्रासदायक ठरत असल्याच्या तक्रारीनंतर सीताबर्डी पोलिसांनी रविवारी (२७ जुलै) पहाटे टोको बारवर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी १.१० लाख रुपयांचे साउंड सिस्टीम जप्त केल्याची माहिती आहे.
पोलिस उपनिरीक्षक निलेश जयराम वाघ (सीताबर्डी पोलीस स्टेशन) यांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ जुलै रोजी रात्री १२.३५ च्या सुमारास शहर नियंत्रण कक्षाला वायरलेस संदेशाद्वारे धारमपेठमधील फर्जी कॅफेमधून जोरजोरात डीजे वाजविल्या जात असल्याची तक्रार प्राप्त झाली.
त्यानंतर PSI वाघ, पोलीस कर्मचारी सुरेश (5097), प्रविण पीटर (17137), तसेच मोबाईल चालक उमेश (19296) यांनी पोलिस मोबाईल युनिटसह घटनास्थळी धाव घेतली. चौकशीदरम्यान, फर्जी कॅफे असलेल्या इमारतीच्या आठव्या मजल्यावरील ‘टोको बार’मध्ये मोठ्या आवाजात डीजे सुरु असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी चौकशी केली असता बार व्यवस्थापकाने आपली ओळख राहुल महादेव सोमकुवर (वय ४०, रा. शिवाजी गार्डन, शिवाजीनगर, नागपूर) अशी सांगितली. डीजे कार्यक्रमासाठी अधिकृत परवानगी विचारली असता, तो कोणताही परवाना दाखवू शकला नाही.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, पोलिसांनी खालील साउंड सिस्टीम जप्त केली:
- डीजे साउंड बॉक्स – किंमत ₹२०,०००
- मिक्सर – किंमत ₹९०,०००
एकूण जप्त साउंड सिस्टीम : ₹१.१० लाख
पोलिसांनी सांगितले की, टोको बारने यापूर्वीदेखील आवाज मर्यादा नियमांकडे दुर्लक्ष केले होते. अधिकृत परवानगी नसताना डीजे वाजवून त्यांनी नागपूर शहराच्या पोलीस उपायुक्तांनी जारी केलेल्या मनाई आदेशांचे उल्लंघन केले आहे.
या प्रकरणी राहुल सोमकुवर याच्याविरोधात भारतीय नवीन दंडसंहिता (BNS) कलम २९३ आणि २२३ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम ३३(१), १३१ व ३६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सीताबर्डी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.