
नागपूर -नागपुरात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी एकाच रात्री दोन मोठ्या कारवाया करत नशेच्या नेटवर्कला मोठा धक्का दिला आहे. कोतवाली आणि कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या कारवायांमध्ये तब्बल ३४.१५ ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली. दोन्ही कारवायांमध्ये एकूण ६ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
नागपुरात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांची कारवाई सुरूच आहे. अमली पदार्थ विरोधी पथक आणि गुन्हे शाखेच्या पथकाने वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई करत एमडी तस्करी करणाऱ्यांवर मोठा प्रहार केला.
पहिली कारवाई कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाल येथील दसरा रोडवर मॅस्कॉट होंडा सर्व्हिस सेंटरसमोर करण्यात आली. पोलिसांनी शहजान शेख याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे सुमारे २० ग्रॅम एमडी पावडर आढळून आली. तिची किंमत सुमारे २ लाख रुपये आहे.
पोलिसांनी आरोपीकडून सुमारे ४० हजार रुपये किमतीचा भ्रमणध्वनी संच, इतर साहित्य तसेच सुमारे १ लाख २० हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण ३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणातील शेख अर्शद उर्फ राजा याचा शोध सुरू असून, त्याचे नाव यापूर्वीही गंभीर गुन्ह्यांमध्ये समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, दुसरी कारवाई कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आर्यनगर येथील जगदंबा रेसिडेन्सीमध्ये करण्यात आली. गुन्हे शाखेच्या पथकाने फरहान आयुब शेख याला अटक केली. त्याच्याकडून १४.१५ ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली असून, तिची किंमत सुमारे १ लाख ४१ हजार रुपये आहे.
याशिवाय वजनकाटा, रोख रक्कम, दुचाकी, भ्रमणध्वनी संच आणि इतर साहित्य असा एकूण २ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणातील शाहिद अन्सारी हा आरोपी फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.
दोन्ही प्रकरणांमध्ये अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेला एमडी कुठून आणण्यात आला, त्याचा पुरवठादार कोण आणि नागपुरातील या अमली पदार्थांच्या नेटवर्कमागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.




