
नागपूर : ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करण्यासाठी सायबर ठगांकडून नवनवीन पद्धतींचा वापर केला जात आहे. नागपुरात ७९ वर्षीय महिलेला ज्येष्ठ नागरिक कार्ड बनवून देण्याचे आमिष दाखवत सायबर ठगाने तिच्या मोबाइलवर ताबा मिळवला. त्यानंतर बँकेत जमा असलेली मुदत ठेव मोडून सुमारे २६ लाख रुपये लंपास केले. या प्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
बँक कर्मचारी असल्याचे सांगून फोन-
छावणी परिसरातील काटोल रोड येथील रहिवासी शिवानी स्वपन कुमार मिश्रा (७९) यांना १४ आणि १५ ऑगस्टदरम्यान एका अनोळखी व्यक्तीने फोन केला. त्याने आपण आयसीआयसीआय बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिक कार्ड बनवून देण्याची माहिती दिली.
हे कार्ड मिळाल्यानंतर पेन्शनसोबत बँकेच्या विविध विशेष सुविधांचा लाभ मिळेल, असे आरोपीने महिलेला सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून महिलेने काही वैयक्तिक माहिती त्याच्यासोबत शेअर केली.
मोबाइलवर ताबा मिळवत एफडी मोडली-
वैयक्तिक माहिती मिळाल्यानंतर सायबर ठगाने महिलेच्या मोबाइलवर ताबा मिळवत बँक खात्याशी संबंधित व्यवहारांपर्यंत पोहोच मिळवली. त्यानंतर खात्यातील मुदत ठेव मोडून त्यातील रक्कम काढून घेतली.
खात्यातून पैसे वजा झाल्याचे संदेश मोबाइलवर आल्यानंतर महिलेला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ संबंधित बँकेशी संपर्क साधून सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन-
सायबर उपनिरीक्षक कृष्णा वाघ यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. बँक कर्मचारी असल्याचे सांगून फोन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस वैयक्तिक किंवा बँकिंगशी संबंधित माहिती देऊ नये. मुदत ठेव, मालमत्तेची कागदपत्रे आणि इतर महत्त्वाच्या दस्तऐवजांची छायाचित्रे मोबाइलमध्ये ठेवणे टाळावे.
संशयास्पद फोन, संदेश किंवा दुवे प्राप्त झाल्यास त्यावर तत्काळ प्रतिक्रिया देण्याऐवजी संबंधित बँक किंवा विभागाशी थेट संपर्क साधून माहितीची खातरजमा करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.



