Published On : Tue, Aug 25th, 2026
By Nagpur Today Nagpur News

गुन्हेगारांवर डीसीपी रश्मिता राव यांचा कडक बडगा; शिबू टोळीतील तिघांसह पाच जण तडीपार

Advertisement

गुन्हेगारांवर डीसीपी रश्मिता राव यांचा कडक बडगा; शिबू टोळीतील तिघांसह पाच जण तडीपारनागपूर : शहरातील गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरोधात कठोर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. परिमंडळ-४च्या पोलीस उपायुक्त रश्मिता राव यांनी शिबू टोळीतील तीन सदस्यांसह पाच गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. यापैकी चार जणांना दोन वर्षांसाठी, तर एका गुन्हेगाराला तब्बल सहा वर्षांसाठी जिल्ह्याबाहेर करण्यात आले आहे.

सेबॅस्टियन ऊर्फ शिबू राफेल अँथोनी (३२), जाटतरोडी-इंदिरानगर येथील सचिन प्रदीप वासनिक (३५) आणि अभिषेक रवींद्र बोरकर (३०) या तिघांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. या तिघांविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण, धमकी, खंडणी आणि अपहरण यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या सततच्या गुन्हेगारी कारवायांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा न झाल्याने इमामवाडा पोलिसांनी तडीपारीचा प्रस्ताव तयार करून वरिष्ठांकडे सादर केला होता. त्यानंतर पोलीस उपायुक्त रश्मिता राव यांनी तडीपारीचे आदेश जारी केले.

लकी सहा वर्षांसाठी तडीपार-
रामबाग येथील प्रियांशू ऊर्फ लकी मोहन ठाकरे (२१) याला तब्बल सहा वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, मारहाण आणि दरोड्याची तयारी केल्याप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल आहेत.

रवीलाही दोन वर्षांची तडीपारी-
ऊंटखाना येथील रवि ऊर्फ ऋषी भाऊराव हाडके (२४) यालाही दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध दरोडा, खुनाचा प्रयत्न, विनयभंग, चोरी आणि मारहाण यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. प्रतिबंधात्मक कारवाईनंतरही त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरू राहिल्याने पोलिसांनी त्याच्यावर तडीपारीची कारवाई केली.

Advertisement

या पाचही गुन्हेगारांना जिल्ह्याच्या हद्दीबाहेर पाठविण्यात आले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये धडकी भरली असून, कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा स्पष्ट संदेश पोलिसांनी दिला आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.