
नागपूर : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ध्वनिप्रदूषण आणि लेझर दिव्यांच्या वापराबाबत नागपूर पोलिसांनी ध्वनियंत्रणेची विशेष तपासणी केली. पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या या चाचणीदरम्यान पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या उपस्थितीत चार बेस आणि चार टॉप असलेल्या डीजे ध्वनियंत्रणेची तपासणी करण्यात आली.
यावेळी विविध गाणी वाजवून डेसिबल मीटरच्या माध्यमातून ध्वनीची पातळी मोजण्यात आली. तसेच लेझर दिव्यांची क्षमता आणि त्यांच्या वापराबाबतच्या विविध बाबींचीही तपासणी करण्यात आली.
आगामी सण-उत्सव आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ध्वनियंत्रणा निर्धारित ध्वनीमर्यादा आणि नियमांनुसारच वापरली जावी, हा या चाचणीमागील पोलिसांचा उद्देश आहे. ध्वनियंत्रणा चालकांना नियमांचे पालन करण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात येणार आहेत.
उत्सवाचा आनंद कायम ठेवताना ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.




