
नागपूर : सीताबर्डी परिसरात वर्चस्व आणि खंडणीच्या वादातून आकाश नेवारे याची चाकूंनी भोसकून हत्या केल्यानंतर मुंबईच्या दिशेने पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या सहा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सीताबर्डी पोलिस, गुन्हे शाखा पथक-२ आणि अंबाझरी पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये विशाल चचाणे, पीयूष बघेल, रंजीत माहतो, अंकुश मरसकोल्हे, सचिन सेलारे आणि एका अल्पवयीनाचा समावेश आहे.
सतपुडा लॉनजवळ रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास ही थरारक घटना घडली. गोंडटोली, तेलंगखेडी-अंबाझरी येथील आकाश नेवारे हा काही साथीदारांसह धरमपेठ येथील किंग किचन बारमध्ये गेला होता. तेथून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यात वाद झाला. आकाश आणि संशयित आरोपींमध्ये यापूर्वीपासूनच वर्चस्वाच्या कारणावरून रंजिश असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
आरोपींनी आकाशला सतपुडा लॉनजवळील गल्लीत बोलावले. तेथे पुन्हा वाद झाल्यानंतर आरोपींनी त्याच्यावर चाकूंनी सपासप वार केले. या हल्ल्यात आकाशच्या शरीरावर तब्बल २३ जखमा आढळून आल्या. गंभीर जखमी झालेल्या आकाशचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी पसार झाले.
मात्र, पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. आरोपी मुंबईच्या दिशेने पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकांनी त्यांचा माग काढत वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली. अखेर सर्व सहा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, विशाल चचाणे, पीयूष बघेल आणि सचिन सेलारे हे सुमारे दहा दिवसांपूर्वीच हत्या प्रकरणात कारागृहातून बाहेर आले होते. मृतक आकाश नेवारे याच्याविरुद्धही हत्या आणि जबरी चोरीसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांपैकी काही जणांविरुद्धही हत्या, लूट आणि इतर गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, या हत्येमागे नेमके वर्चस्वाचे कारण होते की खंडणीच्या मागणीवरून वाद झाला, याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. घटनास्थळ तसेच परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासले जात असून, या हत्याकांडामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.
या घटनेमुळे सीताबर्डी परिसरात खळबळ उडाली असून, संभाव्य टोळीयुद्धाची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी परिसरातील बंदोबस्त वाढवला आहे.




