
नागपूर : नागपूर शहरातील गुन्हेगारी विश्वात धोकादायक ठरलेला करण उर्फ रोहित पुरषोत्तम नौकरीया (वय २२), रा. प्लॉट नं. ५४, इंगोले ले-आउट, दुर्गामाता मंदिराजवळ, पोलीस ठाणे मानकापूर हद्दीतील, याच्यावर अखेर नागपूर पोलिसांनी MPDA कायदा १९८१ अंतर्गत कठोर कारवाई करत त्याला स्थानबद्ध केले आहे.
करण नौकरीया याच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, गंभीर दुखापत, खंडणी, अंमली पदार्थ बाळगणे, दरोडा टाकण्याचा प्रयत्न, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, अश्लील शिवीगाळ, धमकी देणे, व स्थानिक गुन्हेगारी करणाऱ्या टोळक्यांशी संबंध असल्याचे आरोप असून, नागपूर शहरातील मानकापूर, गिट्टीखदान, कपिलनगर व सदर पोलीस ठाण्यांत एकूण २५ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
याआधी देखील याच्यावर २०२१ व २०२३ मध्ये CRPC कलम ११० अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर MPDA अंतर्गत दोन वेळा एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले होते. परंतु तरीही याच्या वर्तणुकीत कोणतीही सुधारणा न झाल्याने २०२४ मध्येही त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. दोन वर्षांच्या चांगल्या वर्तणुकीसाठी त्याच्याकडून अंतिम बंधपत्र घेतले गेले होते. मात्र, त्याने तेही उल्लंघन करून पुन्हा गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले.
सार्वजनिक सुव्यवस्था व नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या या आरोपीविरोधात पो. ठाणे मानकापूर येथून प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानंतर मा. पोलीस आयुक्त श्री. रविंद्रकुमार सिंगल यांच्या आदेशाने आरोपीस छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती कारागृह, हर्सूल येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.
ही कारवाई मा. सह पोलीस आयुक्त श्री. नविनचंद्र रेड्डी, मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री. राजेंद्र दाभाडे, पोलीस उप आयुक्त झोन २ श्री. नित्यानंद झा, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती सुनिता मेश्राम यांच्या मार्गदर्शनात पार पडली. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर, पोउपनि राजेश पैदलवार (MPDA सेल), पोउपनि अमित देशमुख, तसेच इतर पोलीस अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
नागपूर पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काहीसा दिलासा निर्माण झाला असून, अशा धोकादायक गुन्हेगारांवर पोलिसांकडून कठोर पावले उचलली जात असल्याचा संदेश यातून दिला गेला आहे.