नागपूर : हुडकेश्वर परिसरात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिचे अश्लील फोटो काढून ते इन्स्टाग्राम आणि ई-मेलद्वारे नातेवाईकांना पाठवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी 22 वर्षीय संदीप संजय उमरकर याच्याविरुद्ध पोक्सोसह विविध कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2024 मध्ये पीडित अल्पवयीन मुलीची आरोपीशी ओळख झाली. त्यानंतर प्रेमसंबंधाचे आमिष दाखवून आरोपीने तिला आपल्या भाड्याच्या घरात वारंवार नेले आणि तिच्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
याच काळात आरोपीने मुलीचे अश्लील फोटो मोबाईलमध्ये काढले. त्यानंतर त्याने स्वतःच्या ई-मेल आयडीवरून तसेच “Naughty Girl” या नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ते फोटो पीडितेच्या मावशीच्या इन्स्टाग्राम आणि ई-मेलवर पाठवल्याचे तपासात समोर आले आहे.
पीडितेच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी एफआयआर क्रमांक 608/2026 नोंदवला असून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 64(2), 65(1)(m) व 3(5), पोक्सो कायदा 2012 मधील कलम 4 व 6 तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 मधील कलम 66E व 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास हुडकेश्वर पोलीस करत आहेत.





