नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या इतिहासात आज नवा अध्याय लिहिला जाणार असून, देशातील पहिली स्वदेशी हायड्रोजनवर चालणारी प्रवासी रेल्वे आजपासून सेवेत दाखल होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हरियाणातील जिंद–सोनीपत मार्गावरील या विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ही रेल्वे भारताला हायड्रोजन ट्रेन चालवणाऱ्या मोजक्या देशांच्या यादीत स्थान मिळवून देणार आहे.
सुमारे ८२ कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या १० डब्यांच्या रेल्वेमध्ये दोन हायड्रोजन ड्रायव्हिंग पॉवर कार आणि आठ प्रवासी डबे आहेत. ही ट्रेन पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर विकसित करण्यात आली असून, भारतीय रेल्वेच्या ‘नेट झिरो कार्बन उत्सर्जन’ ध्येयाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
ही रेल्वे जिंद ते सोनीपत या ८९ किलोमीटरच्या मार्गावर धावणार असून, १४ स्थानकांवर थांबा घेणार आहे. दररोज सकाळी ७.४० वाजता जिंदहून सुटणारी ट्रेन ९.४० वाजता सोनीपतला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ती १०.३० वाजता सोनीपतहून सुटून दुपारी १ वाजता जिंदला पोहोचेल. या ट्रेनचा कमाल वेग ताशी ७५ किलोमीटर असेल.
प्रवाशांसाठी या ट्रेनचे किमान भाडे ५ रुपये, तर जिंद ते सोनीपत संपूर्ण प्रवासासाठी २५ रुपये निश्चित करण्यात आले आहे. एका फेरीत सुमारे २,६०० प्रवासी या रेल्वेतून प्रवास करू शकतील.
या प्रकल्पासाठी जिंद येथे देशातील सर्वात मोठे हायड्रोजन इंधन भरण्याचे केंद्र उभारण्यात आले आहे. येथे संकुचित हायड्रोजन वायू साठवून विशेष प्रणालीद्वारे ट्रेनमध्ये इंधन भरले जाईल.
सुरक्षेच्या दृष्टीनेही रेल्वे प्रशासनाने अत्याधुनिक उपाययोजना केल्या आहेत. हायड्रोजन गळती शोधक, ज्वाला शोधक प्रणाली आणि इंधन भरण्याच्या संपूर्ण प्रक्रियेवर २४ तास देखरेख ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
पर्यावरणपूरक, आधुनिक आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करणारी ही हायड्रोजन ट्रेन भारतीय रेल्वेसाठी एक महत्त्वाचा टप्पा मानली जात असून, भविष्यात अशा आणखी रेल्वा देशभर सुरू करण्याचा रेल्वेचा मानस आहे.





