नागपूर : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या आयुष्मान कार्डाची ई-केवायसी (E-KYC) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे १ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विशेष ई-केवायसी सेवा पंधरवडा राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची तयारी करण्यासाठी गुरुवारी मनपा आयुक्त डॉ. विपीन यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली.
बैठकीत आयुक्त डॉ. विपीन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विशेष मोहिमेदरम्यान जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून समन्वयाने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
३.१४ लाख लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड
मनपा क्षेत्रात आतापर्यंत ३,१४,२०० पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान कार्डांचे वितरण करण्यात आले आहे. तसेच १,१५७ आशा स्वयंसेविका PMJAY अंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेसाठी कार्यरत आहेत.
१ डिसेंबर २०२५ ते जुलै २०२६ या कालावधीत आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून २,६८,५७५ लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण करण्यात आली आहे.
अनेक माध्यमांतून उपलब्ध ई-केवायसी सुविधा
ई-केवायसीची प्रक्रिया आशा स्वयंसेविका, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे (UPHC), शहरी आरोग्य व आरोग्यवर्धिनी केंद्रे (UHWC), रास्तभाव दुकानदार, CRC केंद्र चालक तसेच अधिकृत पोर्टल आयडीधारक यांच्या माध्यमातून सुरू आहे. उर्वरित पात्र लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचवण्यासाठी १ ते १५ ऑगस्टदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
दरवर्षी ५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत १,२५६ प्रकारचे उपचार व शस्त्रक्रिया शासकीय तसेच मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत.
प्रत्येक पात्र कुटुंबाला दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य संरक्षण मिळते. तसेच ७० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त ५ लाख रुपयांचे आरोग्य संरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे.
GMC, IGGMC आणि ४३ खासगी रुग्णालयांत सुविधा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (IGGMC) तसेच शहरातील ४३ मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांमध्ये ‘आरोग्य मित्र’ यांच्या माध्यमातून आयुष्मान कार्ड तयार करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
लाभार्थी Ayushman App किंवा beneficiary.nha.gov.in पोर्टलवर आधार क्रमांक आणि आधारशी संलग्न मोबाईल क्रमांकाच्या मदतीने स्वतःही ई-केवायसी पूर्ण करून आयुष्मान कार्ड डाउनलोड व प्रिंट करू शकतात.
मनपा आरोग्य विभागाने सर्व पात्र नागरिकांना १ ते १५ ऑगस्टदरम्यानच्या विशेष ई-केवायसी सेवा पंधरवड्यात सहभागी होऊन PMJAY कार्डची ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.





