Published On : Wed, Jul 8th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या परसवानी कुटुंबाचा ११ दिवसांनंतर शोध; जी-पे व्यवहारामुळे लागला ठावठिकाणा, पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले!

Advertisement

नागपूर : धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बलराज मार्ग येथून ११ दिवसांपूर्वी रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेल्या परसवानी कुटुंबाचा अखेर शोध लागला आहे. मोबाईल फोन सतत बंद असल्यामुळे तपासात अडथळे येत होते. मात्र, एका जी-पे (GPay) व्यवहारातून मिळालेल्या डिजिटल लोकेशनच्या आधारे नागपूर पोलिसांनी कुटुंबाचा पिंपरी-चिंचवड येथे ठावठिकाणा शोधून काढला. त्यानंतर त्यांना नागपुरात आणण्यासाठी विशेष पोलीस पथक पुण्याकडे रवाना झाले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, नागपूरातील बलराज मार्ग परिसरातील दुर्गा सदनमध्ये राहणारे जितेंद्र परसवानी, त्यांची आई हर्षा परसवानी, पत्नी इशिता, मुलगी खुशी आणि मुलगा कृष्णा हे २४ जूनपासून बेपत्ता होते. सर्वांचे मोबाईल बंद असल्याने तपासाला वेग येत नव्हता.

तपासादरम्यान पोलिसांना समजले की, कुटुंबीय केवळ ऑनलाइन व्यवहारासाठी काही सेकंद इंटरनेट सुरू करत होते. पिंपरी-चिंचवडमध्ये करण्यात आलेल्या एका जी-पे व्यवहारातून पोलिसांना महत्त्वाचा धागा मिळाला आणि त्यावरून कुटुंबाचा शोध लागला.

प्राथमिक तपासात आर्थिक अडचणींमुळे परसवानी कुटुंबाने नागपूर सोडल्याची माहिती समोर आली आहे. जितेंद्र परसवानी हे मालमत्तेतील हिस्सा विकून कर्जाची परतफेड करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, कौटुंबिक आणि कायदेशीर अडचणींमुळे व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे आर्थिक तणावातून त्यांनी कोणालाही न सांगता नागपूर सोडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

Advertisement

सध्या संपूर्ण कुटुंब सुखरूप असून, नागपूर पोलिसांचे पथक त्यांना नागपुरात आणत आहे. त्यानंतर संपूर्ण घटनाक्रमाबाबत त्यांची सविस्तर चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा तपास धंतोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साईनाथ रामोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, हवालदार नितीन कोल्हे आणि त्यांच्या पथकाने या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.