नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी आरक्षण सोडत आज (11 नोव्हेंबर) सकाळी कविवर्य सुरेश भट सभागृहात जाहीर करण्यात आली. या आरक्षण सोडतीनंतर नागपूर महापालिकेचे राजकीय गणित स्पष्ट झाले असून, एकूण 151 नगरसेवकांच्या जागांपैकी 50 टक्के जागा महिलांसाठी राखीव ठरल्या आहेत. यामुळे यंदा 76 नगरसेविका आणि 75 नगरसेवक महापालिकेत असणार आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर, नागपूर महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार आणि माजी नगरसेवकांचे लक्ष या आरक्षण सोडतीकडे लागले होते.
नागपूर महानगरपालिकेतील एकूण जागा — 151
- सर्वसाधारण प्रवर्ग : 69
- इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) : 40
- अनुसूचित जाती (SC) : 30
- अनुसूचित जमाती (ST) : 12
महापालिकेत एकूण 38 प्रभाग आहेत. त्यापैकी 37 प्रभागांत प्रत्येकी 4 सदस्य तर 38 क्रमांकाच्या प्रभागात 3 सदस्य असतील.
अनुसूचित जाती (SC) साठी राखीव 30 प्रभाग
यांपैकी 15 महिला प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत.
प्रभाग क्रमांक:
2 अ, 4 अ, 5 अ, 6 अ, 7 अ, 10 अ, 12 अ, 14 अ, 17 अ, 24 अ, 25 अ, 29 अ, 30 अ, 32 अ, 37 अ
अनुसूचित जमाती (ST) महिला राखीव प्रभाग — एकूण 6
प्रभाग क्रमांक:
8 अ, 13 ब, 14 ब, 20 ब, 21 अ, 34 ब
निवडणुकीची पार्श्वभूमी
महानगरपालिकेतील आरक्षण जाहीर झाल्याने आता सर्व राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची रणनीती ठरवण्यास सुरुवात केली आहे. अनेक प्रभागांमध्ये आरक्षण बदलल्याने काही विद्यमान नगरसेवकांच्या जागांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
राजकीय पातळीवर या सोडतीमुळे नागपूरच्या प्रभागरचनेत नव्या समीकरणांची निर्मिती होणार असून, महिलांच्या संख्येत वाढ झाल्याने महापालिकेतील प्रतिनिधित्वाचा चेहरामोहरा बदलणार आहे.










