
नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात असतानाच शहरातील सट्टा बाजाराने राजकीय वातावरण अधिक तापवले आहे. १५ जानेवारीला होणाऱ्या महापालिका निवडणुकीपूर्वीच सट्टेबाजांनी भाजपला स्पष्ट आघाडी देत सत्ता पुन्हा त्यांच्याच हाती जाण्याचा अंदाज वर्तवला आहे. सत्तेचा कौल मतपेटीतून बाहेर येण्याआधीच सट्टा बाजारात लागल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सट्टा बाजारातील माहितीनुसार भाजपवर मोठ्या रकमा लावल्या जात असून, काँग्रेस मात्र या शर्यतीत पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. वंचित बहुजन आघाडी आणि AIMIM यांच्यावर मर्यादितच पैज लागली असून, विरोधी मतांचे विभाजन भाजपसाठी फायदेशीर ठरण्याची चर्चा उघडपणे सुरू आहे. “भाजपची संघटना मजबूत, प्रचार आक्रमक आणि निवडणूक यंत्रणा सज्ज” असा ठाम विश्वास सट्टेबाज व्यक्त करत आहेत.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, २०१७ मध्ये तब्बल १० जागा जिंकणारी बहुजन समाज पार्टी यंदा सट्टा बाजारातून अक्षरशः गायब झाली आहे. BSPकडून प्रभावी पुनरागमनाची अपेक्षा नसल्याचा थेट संदेश सट्टेबाजांच्या हालचाली देत आहेत, ज्यामुळे पक्षाच्या स्थानिक ताकदीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रचाराची सांगता मंगळवारी होत असून, गुरुवारी मतदान आणि शुक्रवारी निकाल जाहीर होणार आहे. मतदानाच्या तोंडावर सर्वच पक्षांतील उमेदवारांमध्ये अस्वस्थता वाढली असून, शेवटच्या क्षणापर्यंत मतदार खेचण्यासाठी जोरदार धडपड सुरू आहे.
सत्तेचा अंतिम फैसला मतदारच करणार असला, तरी सट्टा बाजाराचा स्पष्ट इशारा , “नागपूर पुन्हा भाजपचाच?” असा सवाल निर्माण झाला आहे. आता हा अंदाज खरा ठरणार की मतदार सट्टेबाजांना धक्का देणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.








