Published On : Wed, Jul 31st, 2019

नागपूर महानगरपालिका ग्रामीण-नागरी भागीदारीत अग्रेसर : महापौर नंदा जिचकार

जपानमधील ‘ग्रामीण-नागरी भागीदारी’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग

Mayor Nanda Jichkar

नागपूर : नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ग्रामीण भागातील नद्या आणि धरण क्षेत्रात अत्यल्प झालेला पावसामुळे नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्याचे आव्हान नागपूर महानगरपालिकेसमोर आहे. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सुरळीत राहावा यासाठी नागपूर महानगरपालिकेने जलसंवर्धनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. यापुढे ग्रामीण भागानेही जलसंवर्धनाच्या बाबतीत कार्य करीत नागरी-ग्रामीण क्षेत्राची भागीदारी वाढविण्यात सहकार्य करावे. मनपा यासाठी पुढाकार घेईल, अशी भूमिका महापौर नंदा जिचकार यांनी मांडली.

जपानमध्ये इंस्टिट्युट फॉर ग्लोबल एनव्हायर्नमेंट स्ट्रेटॅजीस कियो युनिव्हर्सिटी आणि व्ही.एन.आय.टी. च्या संयुक्त विद्यमाने योकोहामा येथे सस्टेनेबल एशिया ॲण्ड दि पॅसिफिक परिषद २०१९ चे आयोजन करण्यात आले होते. सदर परिषदेत महापौर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाल्या होत्या. परिषदेला संबोधित करताना त्या बोलत होत्या.

महापौर नंदा जिचकार यांनी जपान सरकारच्या तांत्रिक तज्ज्ञांना बदलत्या वातावरणामुळे नागपूर शहरात वाढत असलेल्या जलसंकटाशी सामना करण्याच्या दृष्टीने जलव्यवस्थापनाच्या क्षेत्रात अजून कार्य करण्याची आवश्यकता विदित केली. नागपूर महानगरपालिकद्वारे नागरी व ग्रामीण क्षेत्रात वाढत्या भागीदारी वर प्रकाश टाकताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, मनपा डिफेन्स कॉलनी तसेच नजिकच्या ग्रामपंचायतींना अंबाझरी तलावातून पाणी पुरवठा करीत आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून वीज केंद्रांना त्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. यामुळे शुद्ध पाण्याची बचत होत नागपूर महानगरपालिकेला महसूलसुद्धा प्राप्त होत असल्याची माहिती त्यांनी परिषदेत दिली.

विशेष म्हणजे, मध्यप्रदेश सरकारने चौराई धरण बांधल्याने नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तोतलाडोह प्रकल्पात पाणी कमी झाले आहे. यामुळे नागपूर शहराला जलसंकटाचा सामना करावा लागत आहे. जुलै महिन्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. पावसाचे आगमन उशिरा झाल्याने नदी, तलावही आटले आहेत. कधी नव्हे ते पहिल्यांदा नागपूर शहराला एक दिवसाआड पाणी मिळत असल्यामुळे नागरिकांमध्ये पाण्याविषयी जागरुकता निर्माण झाली आहे, असे सांगत जलयुक्त शिवारच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जलस्तर वाढला आहे. नागपूर महानगरपालिकासुद्धा रेन वॉटर हार्वेस्टिंगवर भर देत आहे. यामुळे शहरातील विहिरी आणि बोअरवेलला पुनर्जीवन प्राप्त होईल, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. जलसंवर्धनाच्या क्षेत्रात नागरी-ग्रामीण भागीदारी अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिका पुढाकार घेईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

परिषदेत युनिव्हर्सिटी फॉर ग्लोबल स्ट्रेटेजीस येथील नॅचरल रिसोर्सेस ॲण्ड इकोसिस्टीमचे कार्यक्रम संचालक आंद्रे मादेर, आयजीईएसचे अध्यक्ष प्रा. काझुहिको ताक्युचि यांच्यासह वक्ता म्हणून डॉ. राजीब शॉ, श्रीमती तोमोको ताकेडा, डॉ. समीर देशकर, बिजॉनकुमार मित्रा, गटचर्चेमध्ये प्रा. हसन वीरजी, श्रीमती नंदा जिचकार, माकोटो इशिगाऊको यांचा सहभाग होता.