Published On : Wed, Jul 31st, 2019

मनपाच्या ५० गुणवंत सफाई कामगारांचा सत्कार

Advertisement

शहीद सफाई सैनिक दिनानिमित्त गौरव : आता प्रत्येक महिन्याला होणार ३८ सफाई कामगार सन्मानित

नागपूर : शहीद सफाई सैनिक दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण शहरात सेवा देणा-या ५० गुणवंत सफाई कामगार व ऐवजदार सफाई कामगारांचा बुधवारी (ता.३१) सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे, आता झोन स्तरावर प्रभाग निहाय गुणवंत सफाई कामगार व ऐवजदारांचा सत्कार करण्यात येणार आहे. दर महिन्याला प्रत्येक प्रभागातून एक असे संपूर्ण प्रभागातील ३८ सफाई कर्मचा-यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

शहीद सफाई सैनिक दिनानिमित्त बुधवारी (ता. ३१) डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात आयोजित गुणवंत सफाई कामगार व ऐवजदारांच्या सत्कार समारंभात उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती अभय गोटेकर, महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गि-हे, धंतोली झोन सभापती लता काडगाये, हनुमान नगर झोन सभापती माधुरी ठाकरे, धरमपेठ झोन सभापती अमर बागडे, नगरसेविका रुपा रॉय, नगरसेविका लीला हाथीबेड, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे आदी उपस्थित होते.

समारंभात उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्यासह अन्य सर्व मान्यवरांच्या हस्ते दहाही झोनमधील ३० स्थायी सफाई कामगार व २० ऐवजदार असे एकूण ५० सफाई कामगारांना तुळशी रोप, शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यासाठी प्रत्येक झोनमधून तीन स्थायी सफाई कामगार व दोन ऐवजदार सफाई कामगारांची निवड करण्यात आली आहे. तत्पूर्वी उपमहापौर दीपराज पार्डीकर यांच्यासह सर्व मान्यवरांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षि वाल्मिकी व भगवान सुदर्शन यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन केले.

यावेळी बोलताना उपमहापौर दीपराज पार्डीकर म्हणाले, सफाई कामगारांच्या हक्कासाठी शहीद झालेल्या भूमसिंग यांच्या स्मरणार्थ शहरातील सफाई कामगारांचा गौरव ही अभिनंदनीय बाब आहे. आज आपले नागपूर शहर स्वच्छतेच्या बाबतीत देशात अग्रस्थानी आहे. शहरात सर्वत्र असलेली स्वच्छता आणि त्यामुळे शहराला मिळालेली ओळख हे सर्व सफाई कामगारांच्या कार्यामुळेच शक्य झाले आहे. स्वच्छ सर्वेक्षणमध्ये पुढेही शहराचे नाव लौकीक व्हावे यासाठी पुढेही कार्य करा, असे आवाहनही उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी यावेळी केले. आता केवळ वर्षातून एकदाच नव्हे तर झोन स्तरावर प्रभाग निहाय गुणवंत सफाई कामगार व ऐवजदारांचा सत्कार करण्यात येणार आहे. दर महिन्याला प्रत्येक प्रभागातून एक असे संपूर्ण प्रभागातील ३८ सफाई कर्मचा-यांना शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र व एक हजार रूपये रोख देउन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी घोषणा उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी यावेळी केली.

स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे म्हणाले, शहराला स्वच्छ करण्याचे महत्वाचे कार्य सफाई कामगारांतर्फे केले जाते. वर्षभर शहराची स्वच्छता करणा-या सफाई कामगारांचा गौरव होणे आवश्यक आहे. सफाई कामगारांच्या हक्कासाठी शहीद झालेल्या भूपसिंग यांच्या स्मरणार्थ करण्यात येणारा सत्कार हा ख-या अर्थाने सफाई कामगारांच्या कार्याचा गौरव आहे, असेही ते म्हणाले.

विरोधी पक्षनेते तानाजी वनवे म्हणाले, शहरात आरोग्यदायी वातावरण निर्माण करून शहरवासीयांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे महत्वाचे कार्य सफाई कामगारांमार्फत केले जाते. त्यांना पूर्णवेळ सुट्टी देउन त्यांच्या कार्याचा सन्मान करणे हा सफाई कामगारांच्या दृष्टीने आणि नागपूर महानगरपालिकेच्या दृष्टीने महत्वाचा दिवस असल्याचे ते म्हणाले.

आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी गुणवंत सफाई कामगारांच्या कार्याची स्तुती करून त्यांचे अभिनंदन केले. स्वच्छता ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. मात्र हे कार्य सफाई कामगार उत्कृष्टरित्या पार पाडतात. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छतेबाबत विशेष लक्ष देत सफाई कामगारांच्या कार्याकडे सर्वांचे लक्ष वेधले, असे ते म्हणाले.

सफाई कामगारांच्या सत्काराची परंपरा नागपूर महानगरपालिकेने जपली आहे. सफाई कर्मचा-यांच्या कार्याचा गौरव व्हावा त्यांचा उत्साह वाढावा यासाठी ही परंपरा पुढेही सुरू राहिल. यासाठी प्रभाग निहाय उत्कृष्ट सफाई कामगाराच्या सत्काराची योजना पदाधिका-यांमार्फत तात्काळ मान्य करण्यात आल्याने याचा फायदा सफाई कामगारांना होणार आहे, असे सांगत याबाबत मनपा प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सर्व मान्यवरांचे अभिनंदन केले.

सफाई कामगारांच्या हक्कासाठी १९५४ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात सफाई कामगार नेते भूमसिंग यांनी आंदोलन केले. आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याने झालेल्या गोळीबारात भूपसिंग शहीद झाले. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून नागपूर महानगरपालिकेतर्फे दरवर्षी ३१ जुलै रोजी गुणवंत स्थायी सफाई कामगार व ऐवजदारांचा सत्कार करण्यात येतो.

कार्यक्रमाचे संचालन राजेश हाथीबेड यांनी केले. आभार झोनल अधिकारी श्री. राठोड यांनी मानले.

सत्कारमूर्ती गुणवंत सफाई कामगार व ऐवजदार
लक्ष्मीनगर झोन – खुशाल रतन मतेलकर, सुखराम मुल्का दहिवले, विमला धनीराम मलीक, प्रमोद शिवराम गेडाम, मुक्ता शिव. धरमपेठ झोन – अमरनाथ मैकु बिरहा, आशिष संतोष शिल्लेदार, पुष्पा धनराज बोहत, काशीनाथ मोतीराम बोरकर, शिला मुलचंद तांबे. हनुमाननगर झोन – पलनी क्रिष्णन शेट्टी, रमेश महादेव मोखाडे, मीना सुनील बेहुनिया, प्रदीप पुंडलीक मेश्राम, सुनीता रमेश मेश्राम. धंतोली झोन – भाउराव सदाशिव सोमकुवर, शिवदास दिलसुख अरखेल, संघमित्रा शंकर झोडापे, रमेश बुधाराम नाईक, पंचशीला विजय रामटेके. नेहरूनगर झोन – किशोर शंभू नन्हेट, मारोती हिरामन साखरकर, सुनीता बाबुलाल लाहोरी, फुलचंद परसराम पाटील, रंजना भुराजी चिकणे. गांधीबाग झोन – दीगांबर रामचंद्र मेश्राम, मुकेश वाल्मीक खरे, छोटी हरीचंद्र कलसे, मोहन आसाराम मेश्राम, संगीता राजन मलीक. सतरंजीपुरा झोन – मनोज छन्नू बैरीसाल, राकेश दस्सी हजारे, मीरा अशोक नहारकर, उदाराम महादेव पंधरे, समीता सुनील भोयर. लकडगंज झोन – सुरेश महादेव पाटील, गणपत महादेव गजभिये, माया उमेश बैरीसाल, राजू पांडुरंग नेवारे, निर्मला विधेस्वर शेंडे. आसीनगर झोन – राजू भगवान सातपुते, नरेंद्र किसन कोचे, निर्मला गोपाल वासनिक, दिलीप रमेश तिलमिले, सीमा संतोष बक्सरे. मंगळवारी झोन – अशोक पांडूरंग दिवटे, भारत जगन मस्ते, छोटी महेंद्र महातो, ग्यानीराम धोडकू वालदे, लक्ष्मी लक्ष्मण टोटलवार.