Published On : Sat, Sep 21st, 2019

नागपूर महानगरपालिकेने आतापर्यन्त रस्त्यावरील ६६७३ खड्डे बुजविले

Advertisement

नागपूर: नागपूर शहरात विविध ठिकाणी रस्त्यावर पावसामुळे झालेले खड्डे बुजविण्याचे काम नागपूर महानगरपालिकेच्या हॉटमिक्स प्लॅन्टच्या माध्यमातून अहोरात्र सुरु असून आतापर्यन्त रस्त्यावरील ६६७३ खड्डे बुजविण्यात आले आहेत. यामुळे वाहनचालकांचा त्रास कमी होण्यास मदत होईल.

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी नुकतेच खड्डे बुजविण्याचे आदेश विभागाला दिले होते त्यांच्या निर्देशानुसार शहरातील खड्डे बुजविण्याचे काम गतीने सुरु आहे.

म.न.पा.हॉट मिक्स प्लॅन्टचे कार्यकारी अभियंता श्री.रामचन्द्र खोत यांनी माहिती देतांना सांगीतले की, शनिवार दि. २० सप्टेंबर २०१९ रोजी कॉफी हाऊस सदर, फरस पुलापासून ते गोधणी रोड नाक्यापर्यन्त, वंजारीनगर रोड पाण्याच्या टाकीजवळ व एल.ए.डी.चौकात खड्डे बुजविण्याचे काम हॉटमीक्स प्लॅन्टच्या माध्यमातून करण्यात आले. तसेच जेट पॅचर मशीनच्या माध्यमातून वर्धमाननगर आणि व्हीसीए या भागातील खड्डे सुध्दा बुजविण्यात आले.

पुढे त्यांनी असे सांगीतले की, १ एप्रिल ते २० सप्टेंबर, २०१९ या कालावधीत रस्त्यावरील ६६७३ खड्डे बुजविण्यात आले असून जेट पॅचरच्या माध्यमातून २२०२ खड्डे दुरुस्त करण्यात आले. त्यांनी सांगीतले की, नागपूर महानगरपालिकेने नागरिकांना होणारा त्रास बघता मेट्रो रेल्वेच्या हध्दीत येणारे तसेच (नॅशनल हाईवे अथारटी) राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण यांच्या रस्त्यावर झालेले खड्डे सुध्दा म.न.पा.च्या वतीने दुरुस्त करण्यात आले आहेत.