Published On : Sat, Sep 21st, 2019

आदर्श आचारसंहितेचे पालन करावे विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर

Advertisement

नागपूर: विधानसभा निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून जिल्ह्यात विधानसभेसाठी 41 लाख 63 हजार 367 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलीस अधीक्षक ग्रामीण राकेश ओला, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघ असून त्यामध्ये 41 लाख 63 हजार 367 एकूण मतदर आहेत. त्यापैकी 21 लक्ष 31 हजार 149 पुरुष मतदार तर 20 लक्ष 32 हजार 118 स्त्री मतदार असून 100 तृतीयपंथी मतदार असणार आहेत.

निर्भय, निष्पक्ष व शांततामय वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी जिल्ह्यात पोलीस व इतर यंत्रणा सज्ज आहे. भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून पुढीलप्रमाणे आहे-

निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा शुक्रवार, दिनांक 27 सप्टेंबर 2019, नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक शुक्रवार, दिनांक 4 ऑक्टोबर 2019, नामनिर्देशन पत्राची छाननी शनिवार, दिनांक 5 ऑक्टोबर 2019, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक सोमवार, दिनांक 7 ऑक्टोबर 2019, मतदानाचा दिनांक सोमवार, दिनांक 21 ऑक्टोबर 2019, मतमोजणी गुरुवार, दिनांक 24 ऑक्टोबर 2019 तर रविवार, दिनांक 27 ऑक्टोबर 2019 रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यातील 18 ते 19 वयोगटातील मतदारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मतदान ओळख पत्राखेरीज आयोगाच्या निर्देशानुसार 11 पद्धतीची वेगवेगळी ओळखपत्रे ग्राह्य धरण्यात येईल. तसेच जिल्ह्यात निवडणुकी दरम्यान वाहतूक व अन्य कामांसाठी 1342 वाहनांची आवश्यकता राहणार आहे. मतदान केंद्रांवर दिव्यांग व्यक्तींसाठी सुविधा जसे- पिण्याचे पाणी, अंधांसाठी ब्रेललिपी व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. जिल्ह्यातील निवडणुकांसाठी इलेक्शन मॅनेजमेंट प्लॅन तयार आहे. आचार संहितेच्या बाबतीत तक्रार असल्यास deo_nagpur या ट्विटर अकाऊंटवर तक्रार करता येईल. असेही श्री. मुदगल यांनी सांगितले.

निवडणुकी दरम्यान जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रतिबंधक कारवाई अंतर्गत एकूण 1200 लोकांवर कारवाई प्रस्तावित असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. भू्‌षणकुमार उपाध्याय यांनी दिली. निवडणुका कालावधीत निवडणूक कर्तव्य पार पाडण्यासाठी 21 हजार 970 इतक्या मनुष्यबळाची आवश्यकता राहणार आहे. तर 4 हजार 382 एवढ्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना राखीव ठेवण्यात येणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्थेची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.