Published On : Tue, Jan 9th, 2018

मोरभवन बसस्थानकावर महिला प्रसाधनगृहाची निर्मिती करा – बंटी कुकडे

Advertisement

नागपूर : मोरभवन येथे दररोज ५० हजारांवर प्रवासी आणि १२५ पेक्षा अधिक ‘आपली बस’च्या फेऱ्या होत असतात. या स्थानकावर मुलभूत सुविधा नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत म्हणून प्राधान्याने महिलांसाठी प्रसाधनगृह, स्वच्छ पिण्याचे पाणी आणि प्रवासी निवारा आदी सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात असे निर्देश परिवहन समिती सभापतींनी दिले.

शहराच्या ह्द्यस्थानी असलेल्या मोरभवन बस स्थानकावर मुलभूत सुविधा नाही. महिलांसाठी शौचालय नाही, शुद्ध पिण्याचे पाणी नाही, अशा अनेक तक्रारी परिवहन विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. याची दखल घेत स्वतः परिवहन सभापतींनी मोरभवन येथील प्रत्यक्ष पाहणी करुन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थिनी आदींशी चर्चा केली. यावेळी काही विद्यार्थ्यांनी सकाळी मार्गावर गर्दी होत असल्याने बस फेऱ्यावाढविण्याची मागणी केली. तर काही प्रवाशांनी त्यांच्या परिसरात बस थांबा देण्याची मागणी केली. यावेळी सर्व मागण्यांची नोंद परिवहन विभागातील कर्मचा-यांनी केली, तसेच सर्व समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील, असे आश्वासन यावेळी परिवहन सभापतींनी प्रवाशांना दिले.याप्रसंगी परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, परिवहन विभागाचे उपअभियंता के.आर.मिश्रा, उप अभियंता मनोज सिंग यांच्यासह आदी अधिका-यांची उपस्थिती होती.

‘आपली बस’ डेपोच्या स्वच्छतेला प्राधान्य

‘आपली बस’ने दररोज सुमारे दोन लाख प्रवासी प्रवास करतात. आपल्या प्रवाशांना स्वच्छ बसचा प्रवास आणि स्वच्छ बस स्थानक देणे परिवहन विभागाची जबाबदारी असल्याने विभागाने बस स्थानकांच्या स्वच्छतेबाबत विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे यावेळी परिवहन सभापतींनी सांगितले. आगामी स्वच्छ सर्वेक्षणासाठीही मनपा परिवहन विभाग सज्ज असून स्वच्छ शहर साकारण्यात बस चालक, वाहकांसह प्रत्येक कर्मचारी आणि परिवहन समिती सदस्य आपले योगदान देणार असल्याची माहिती यावेळी सभापतींनी दिली.